रशियाच्या मिलिट्री परेडमध्ये भारताच्या तिन्ही संरक्षणदलांचा सहभाग

मॉस्को – २४ जून रोजी रशियाच्या रेड स्क्वेअरमध्ये होणाऱ्या भव्य लष्करी संचलनात भारताच्या तिन्ही संरक्षणदलांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. अशा रितीने भारताची तिन्ही संरक्षणदले पहिल्यांदाच दुसऱ्या देशाच्या मिलिट्री परेडमध्ये सहभागी होत असून यामुळे भारत रशियाचे सहकार्य भक्कम असल्याचा संदेश साऱ्या जगाला दिला जात आहे.

Russia-India-Militaryअमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांबरोबर भारताचे संरक्षणविषयक सहकार्य प्रचंड प्रमाणात वाढत असले तरी भारताचे रशियाबरोबरील धोरणात्मक सहकार्यावर त्याचा परिणाम झालेला नाही, ही बाब यातून अधोरेखित होत आहे. दुसऱ्या महायुद्धात ९ मे १९४५ रोजी जर्मनीच्या नाझी सैन्याने सोव्हिएत रशियासमोर शरणागती पत्करली होती. या विजयाचा रशियामध्ये दरवर्षी जल्लोष केला जातो. या निमित्ताने ९ मे रोजी भव्य लष्करी संचलन पार पडते. यावर्षी मात्र कोरोनाव्हायरसची साथ आल्याने सदर मिलिट्री परेड पुढे ढकलण्यात आली होती. २४ जून रोजी ही परेड आयोजित करण्यात आली असून यासाठी भारताच्या संरक्षणदलांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परेडसाठी भारताच्या तिन्ही संरक्षणदलाची पथके रशियन राजधानी मॉस्कोसाठी १९ जून रोजी रवाना होतील. यावर्षी नाझी जर्मनीवर सोव्हिएत रशियाने मिळविलेल्या त्या ऐतिहासिक विजयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून यावेळी रशिया आपल्या लष्करी सार्मथ्याचे जबरदस्त प्रदर्शन या संचलनात करणार असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर भारताच्या तिन्ही संरक्षणदलाची पथके आपल्या या संचलनात सहभागी करुन रशिया भारताबरोबरील आपले सामरिक संबंध दृढ असल्याचा संदेश साऱ्या जगाला देत आहे.

गेल्या काही वर्षापासून भारताचे अमेरिकेचे व्यापारी व लष्करी सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सामरिक करारही संपन्न झाले आहेत. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध विकसित होत असताना त्यांचा भारताच्या रशियाबरोबरील सहकार्यावर विपरीत परिणाम होईल, अशी चिंता काही विश्लेषकांकडून व्यक्त केली जात होती. पण भारताने दुसऱ्या कुठल्याही देशाबरोबरचे भारताचे सहकार्य रशियाला पर्याय ठरु शकत नाही, असे वारंवार स्पष्ट केले होते. अमेरिकेने निर्बंध लादण्याची धमकी दिल्यानंतरही भारताने रशियाकडून ‘एस-४००’ हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी केली होती. याचा सुपरिणाम भारत रशियाच्या सहकार्यावर झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्या भारत व चीनमध्ये सीमावाद निर्माण झाला असून दोन्ही देशांची सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. अशा परिस्थितीत रशिया चीनच्या बाजूने उभा राहिल का? असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला होता. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांना आपल्या लष्करी संचलनात सहभागी करुन रशियाने या प्रश्नाला उत्तर दिल्याचे दिसत आहे.

leave a reply