युक्रेनमधील सर्व नागरिकांना रशियन नागरिकत्व मिळणार

-राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा वटहुकूम

Russian President Vladimir Putin attends meeting with parliamentary leaders in Moscowमॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील सर्व नागरिकांना रशियाचे नागरिकत्व सहज मिळू शकेल, असा वटहुकूम जारी केला. यापूर्वी युक्रेनमधील डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ या प्रांतातील नागरिकांसाठीच रशियाने ही सुविधा दिली होती. युक्रेनकडून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. रशियन राष्ट्राध्यक्षांनी काढलेला आदेश म्हणजे युक्रेनच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.

2019 साली रशियाने पहिल्यांदा युक्रेनमधील डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतात राहणाऱ्या रशियन वंशाच्या नागरिकांना रशियाचे नागरिकत्व देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यावर्षी युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेनंतर खेर्सन व झॅपोरिझिआ या प्रांतातील नागरिकांनाही रशियन नागरिकत्वासाठी पात्र ठरविण्यात आले होते. मात्र आता रशियाने युक्रेनमधील सर्वच नागरिकांसाठी आपले नागरिकत्व खुले केल्याचे समोर आले आहे.

Russian-passportsरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा नवा निर्णय आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. फेव्रुवारी महिन्यात युक्रेनवर लष्करी कारवाई करताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, युक्रेनमधील नाझीवाद व रशियाविरोधी प्रवृत्ती नष्ट करणे हे उद्दिष्ट असल्याची घोषणा केली होती. युक्रेनमधील रशियन वंशाच्या नागरिकांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे तसेच रशियन भाषा व संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही पुतिन यांनी म्हटले होते.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता पुतिन यांनी युक्रेनमधील सर्व नागरिकांसाठी रशियाचे नागरिकत्व खुले करून वेगळा संदेश दिल्याचे मानले जाते. मात्र युक्रेनने यावर तीव्र टीकास्त्र सोडले आहे. पुतिन यांचा आदेश म्हणजे त्यांच्या आक्रमकतेचा पुरावा आहे, असा आरोप युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केला. युक्रेनी जनतेला पुतिन यांच्या नागरिकत्वाची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. युक्रेनी जनतेला जबरदस्तीने रशियन नागरिक बनविण्याचे प्रयत्न अपयशी ठरतील, असेही कुलेबा यांनी बजावले.

दरम्यान, आतापर्यंत डोनेत्स्क, लुहान्स्क व खेर्सनमधील सुमारे सव्वासात लाख नागरिकांनी रशियाचे नागरिकत्व घेतल्याचे समोर आले आहे.

leave a reply