अमेरिका सौदीवर टाकलेले निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन/रियाध – राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सत्तेवर आल्यानंतर सौदी अरेबियाला शस्त्रास्त्रे पुरविण्यावर निर्बंध टाकले होते. पण आता हे निर्बंध मागे घेण्याची तयारी सुरू झाली आहे. याच्या घोषणेसाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सौदी भेटीचे औचित्य साधले जाईल, असे संकेत मिळत आहेत. यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याचीही घोषणा करू शकतात. अशाप्रकारे अमेरिकेवर नाराज असलेल्या सौदीची मनधरणी करून राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीने इंधनाचे उत्पादन वाढवावे, अशी मागणी करू शकतात.

गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल करणारे निर्णय घेतले होते. आखातातील अमेरिकेचा महत्त्वाचा अरब मित्रदेश सौदी अरेबियावर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केले होते. तसेच बायडेन यांनी येमेनमधील सरकारला सत्तेतून बेदखल करणाऱ्या हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळले होते. येमेनमधील संघर्षासाठी सौदीला जबाबदार धरून शस्त्रास्त्रे पुरविण्यावर निर्बंध लादले होते.

bidenबायडेन प्रशासनाच्या या निर्णयाचा अमेरिकेच्या आखातातील हितसंबंधाना जबरदस्त फटका बसला. युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर, अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहे. यामुळे युरोपिय देशांवर इंधनाचे संकट कोसळले असून आखाती देशांनी इंधनाचे उत्पादन वाढवावे, अशी मागणी बायडेन यांनी केली होती. पण बायडेन प्रशासनाच्या धोरणांवर नाराज असलेल्या सौदी आणि आखातातील इतर देशांनी अमेरिकेची मागणी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकेचे हितसंबंध बाधित होत आहेत, मित्रदेश अमेरिकेवरील विश्वास गमावत असल्याची टीका झाली होती. अशा परिस्थितीत, पुढच्या काही दिवसात राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने गेल्या दीड वर्षात सौदीच्या विरोधात घेतलेले निर्णय मागे घेण्याची तयारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये सौदीला शस्त्रास्त्रे पुरविण्यावर टाकलेले निर्बंध मागे घेण्याच्या घोषणेचा समावेश असू शकतो. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या या प्रस्तावाला सौदीकडून कोणता प्रतिसाद दिला जाईल, याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

leave a reply