शांतता असली तरी अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू

-संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – भारत शांतीप्रिय देश आहे, मात्र कुणी आव्हान दिले वा वाकड्या नजरेने पाहिले, तर भारत त्याला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी बजावले आहे. ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’ने (एलबीएसएनएए) आयोजित केलेल्या कार्यक्रमात संरक्षणंत्री राजनाथ सिंग बोलत होते. शांती आणि युद्ध या दोन्हीपैकी एकच काहीतरी कायम राहू शकते, ही स्थिती मागे पडली आहे. आत्ताच्या काळात शांतता असले तरी इतर अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू असते, या परखड वास्तवाची जाणीव संरक्षणमंत्र्यांनी करून दिली आहे.

rajnath-sighमागच्या काही आठवड्यांपासून भारताच्या एलएसीजवळील चीनच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्राजवळ चीनने आपल्या हवाई दलाचे सामर्थ्य दुपटीने वाढविले आहे. तसेच चीनने एलएसीजवळ लष्करी बांधकाम सुरू करून भारताला चिथावणी दिल्याच्याही बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याची दखल अमेरिकेनेही घेतली असून चीनच्या या कारवाया चिंताजनक असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारताची भूमिका थेट शब्दात मांडली. भारत दुसऱ्या देशाच्या इंचभर भूमीचाही ताबा घेणार नाही. भारत शांतीप्रिय देश आहे. मात्र आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तरी भारत त्याला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

हा इशारा देत असताना, संरक्षणमंत्र्यांनी नेमक्या शब्दात आत्ताच्या काळातील सुरक्षाविषयक परिस्थितीची जाणीव देशवासियांना करून दिली आहे. आधीच्या काळाप्रमाणे शांती किंवा युद्ध अशा दोनपैकी एकच स्थिती कायम राहण्यासारखी परिस्थिती नाही. आत्ताच्या काळात शत्रूशी संपूर्ण युद्ध पेटलेले नसले आणिशांतता असली तरी अनेक आघाड्यांवर युद्ध सुरूच असते, असे अत्यंत महत्त्वाचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले.

संपूर्ण युद्ध शत्रूसाठी जितके विध्वंसक असते, तितकेच ते हे युद्ध करणाऱ्या देशासाठीही हानीकारक असते. याची जाणीव झाल्याने गेल्या काही दशकांपासून थेट युद्ध टाळले जाते. त्याच्या ऐवजी छुपे युद्ध आणि थेट संघर्ष न झडणाऱ्या युद्धाच्या तंत्राचा वापर केला जात आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी बजावले आहे.

तसेच तंत्रज्ञान व व्यापाराचा शस्त्रासारखा वापर करण्याचे प्रयत्न चिंता वाढविणारी बाब ठरते, याकडेही संरक्षणमंत्र्यांनी देशाचे लक्ष वेधले. याबरोबरच देशाच्या वाढत्या लष्करी सामर्थ्यावर संरक्षणमंत्र्यानी समाधान व्यक्त केले. आता भारत केवळ स्वतःसाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करीत नाही, तर मित्रदेशांनाही आवश्यक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत आहे, असे राजनाथ सिंग म्हणाले.

leave a reply