भारत-रशिया व्यापारासाठी इराण बंदर उपलब्ध करून देणार

तेहरान – भारत व रशियामधील व्यापारासाठी आपले ‘बंदर अब्बास’ उपलब्ध करून देण्याची तयारी इराणने केली आहे. याची चाचणी सुरू झाली आहे. रशियाच्या सेंट पीटस्‌‍बर्ग शहरातून कंटेनर कॅस्पियन सागराच्या मार्गे इराणच्या ‘बंदर अब्बास’वर आणले जातील. तिथून हे कंटेनर जहाजाद्वारे नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर आणले जातील. यामुळे भारत व रशियाचा व्यापार प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. हा निर्णय घेऊन इराणने आपले महत्त्व अधिकच वाढविल्याचे दावे केले जातात. त्याचवेळी भारताला यामुळे दुहेरी लाभ होणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Map-of-International-Transport2002 साली ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’चा प्रस्ताव रशियाने दिला होता. मात्र त्यावर अधिक काम होऊ शकले नाही. यामुळे भारत व रशियाचे मैत्रिपूर्ण सहकार्य खऱ्या अर्थाने व्यवहारात उतरू शकले नव्हते. भौगोलिक अंतर व पाकिस्तानसारख्या देशाच्याअडथळ्यांमुळे भारतचा रशियाबरोबरील व्यापार मर्यादित झाला होता. पण आता इराणने आपले बंदर अब्बास या व्यापारासाठी खुले केल्याने भारताच्या केवळ रशियाच नाही, तर मध्य आशियाई तसेच युरोपिय देशांबरोबरील व्यापाराचा मार्ग अधिकच प्रशस्त होईल. याचे फार मोठे लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळतील.

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. रशियातून भारतापर्यंत मालवाहतूक करण्यासाठी इराण बंदर अब्बास वापरू देण्याची तयारी करीत असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यामुळे रशिया भारतीय बंदरांशी व त्याद्वारे आग्नेय आशियाशी जोडला जाईलच. शिवाय यामुळे भारताचाही लाभ होणार असून भारत इराणच्या या कॉरिडॉरमुळे युरोपिय देशांशी जोडला जाऊ शकेल, असे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर-एनएसटीसी’चे संस्थापक देश भारत, रशिया व इराण आहेत. 2002 साली यासंदर्भात आलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू होईल आणि चाचणीच्या पातळीवर यावर काम देखील सुरू झाले आहे, असे या इराणी वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. या कॉरिडॉरचे फार मोठे आर्थिक तसेच राजकीय व सामरिक परिणाम संभवतात. याद्वारे इराणने आपले महत्त्व अधिकच वाढविण्याचा डाव खेळत असल्याचे विश्लेषक सांगत आहेत. त्याचवेळी यामुळे भारताला दुहेरी लाभ होतील, असे सांगून विश्लेषकांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

leave a reply