इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिका फिलिपाईन्समधील लष्करी तैनाती वाढविणार

- ‘सॉलोमन आयलंडस्‌‍’मधील दूतावासही पुन्हा सक्रिय

मनिला/ होनिआरा – चीनपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने या क्षेत्रातील लष्करी मोर्चेबांधणीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे संरक्षणमंत्री इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी दक्षिण कोरिया व फिलिपाईन्सला भेट दिली. फिलिपाईन्सच्या दौऱ्यात अमेरिकेची लष्करी तैनाती वाढविण्याच्या करारावर एकमत झाल्याची माहिती दोन्ही देशांनी दिली. या करारानुसार, अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांना फिलिपाईन्समधील चार अतिरिक्त तळांवर तैनातीस मान्यता देण्यात आली आहे. सध्या अमेरिका व फिलिपाईन्समधील ‘बेस ॲग्रीमेंट’नुसार पाच तळांवर अमेरिकी संरक्षणदलाच्या तुकड्या तैनात आहेत.

अमेरिका व फिलिपाईन्समध्ये 1951 साली ‘म्युच्युअल डिफेन्स ट्रिटी’वर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्याअंतर्गत अमेरिकेच्या लष्करी तुकड्या फिलिपाईन्समध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र चीनचा वाढता प्रभाव व दडपणानंतर फिलिपाईन्सने या करारातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. मात्र अमेरिकेने चीनच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून देऊन फिलिपाईन्सच्या सरकारला सदर निर्णय घेण्यापासून रोखले होते. उलट आपल्या सैन्याची फिलिपाईन्समधली तैनाती वाढविण्याचा प्रस्ताव अमेरिकेने दिला होता.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या दौऱ्यात अमेरिका व फिलिपाईन्समध्ये ‘बेस ॲग्रीमेंट’मध्ये सुधारणा करण्यावर एकमत झाल्याची घोषणा करण्यात आली. दौऱ्यादरम्यान ऑस्टिन यांनी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर व संरक्षणमंत्री कार्लिटो गॅल्वेझ ज्युनिअर यांची भेट घेतली. अमेरिकेची वाढीव लष्करी तैनाती तैवानच्या सागरी क्षेत्रापासून जवळच्या क्षेत्रात असणार आहे. त्यामुळे ही तैनाती चीनच्या तैवानवरील संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन करण्यात आल्याचे दिसते.

.दरम्यान, अमेरिकेने पॅसिफिक बेटदेशांचा भाग असलेल्या ‘सॉलोमन आयलंडस्‌‍’वरील दूतावास पुन्हा सक्रिय झाल्याची घोषणा केली. बुधवारी अमेरिकी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. दूतावास पुन्हा कार्यरत होणे हा या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिली.

चीनकडून गेल्या काही वर्षात पॅसिफिक क्षेत्रातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या छोट्या बेटदेशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत. यात अब्जावधी डॉलर्सच्या अर्थसहाय्याचा समावेश आहे. सॉलोमन आयलंडस्‌‍सारख्या बेटदेशाने चीनबरोबर सुरक्षाविषयक करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी अमेरिकेने या क्षेत्रात जोरदार राजनैतिक हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या वर्षी अमेरिकेने पॅसिफिक बेटदेशांची स्वतंत्र परिषद आयोजित केली होती. त्यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शर्मन यांनीही पॅसिफिक बेटदेशांचा दौरा केला होता.

leave a reply