भारताच्या चीनविरोधी आर्थिक निर्णयांनी इतर देशांना प्रोत्साहन मिळेल – अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा कौंसिलच्या अध्यक्षांचा दावा

वॉशिंग्टन – चीनच्या विरोधात उभे राहण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आपल्याकडे असल्याचे भारताने दाखवून दिले आहे. भारताने चिनी ऍप्प्सवर केलेली निर्बंधांची कारवाई आणि चीनच्या गुंतवणूकीविरोधात घेतलेली भूमिका निर्णायक आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देश भारताच्या या ठाम भूमिकेतून प्रोत्साहन घेतील, असा विश्वास अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा कौंसिलच्या अध्यक्षा लिसा कर्टिस यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर भारताने चीनवर वाढविलेल्या दडपणाचे परिणाम येत्या काळात पहायला मिळतील, असा दावा कर्टिस यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय सुरक्षा कौंसिल

गेल्या काही आठवड्यांमध्ये भारताने चीनवर केलेल्या ’डिजिटल स्ट्राईक’चे जबर आर्थिक नुकसान चीनला सोसावे लागत आहेत. भारताने आतापर्यंत चीनच्या १०६ ऍप्प्सवर बंदी टाकली असून सुमारे ३७० चिनी उत्पादने देखील रडारवर असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात यासंबंधी मोठा निर्णय होणार आहे. या व्यतिरिक्त भारतातील सरकारी प्रकल्पांमधील चिनी कंपन्यांची गुंतवणूक देखील भारताने फेटाळली आहे. या व्यतिरिक्त चीनमधून बाहेर पडणार्‍या परदेशी कंपन्यांची गुंतवणूक आकर्षित करण्यातही भारत यशस्वी ठरत आहे. भारताच्या या धडाकेबाज निर्णयांचा दाखला अमेरिकी रा़ष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहसहाय्यक आणि राष्ट्रीय सुरक्षा कौंसिलच्या अध्यक्षा लिसा कर्टिस यांनी भारताचे कौतुक केले.

राष्ट्रीय सुरक्षा कौंसिल

अमेरिकेतील आघाडीचा अभ्यासगट “ब्रुकिंग्ज् इन्स्टिट्युशन’च्या बैठकीत बोलताना लिसा कर्टिस यांनी भारताच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनची विस्तारवादी भूमिका आणि जगाच्या इतर भागातील चीनची लष्करी आक्रमकता यात काहीच फरक नसल्याचे कर्टिस यांनी स्पष्ट केले. अशावेळी चीनच्या विरोधात उभे राहण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आपल्यामध्ये असल्याचे भारताने आपल्या निर्णयातून दाखवून दिल्याचे कर्टिस यांनी लक्षात आणून दिले. चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी भारताने आर्थिक खेळी खेळली असू्न चीनच्या आघाडीच्या ऍप्प्सवरील भारताची बंदी आणि चीनच्या कंपन्यांची गुंतवणूक थांबवून भारताने चीनला जबर हादरा दिल्याचे कर्टिस म्हणाल्या. भारताने चीनच्या विरोधात स्वीकारलेल्या या भूमिकेकडे इंडो-पॅसिफिक क्षेत्र पाहत असून भारताने दाखविलेल्या या खंबीरतेने इतरांनाही प्रोत्साहन मिळेल, असा दावा कर्टिस यांनी केला.

भारताच्या या आर्थिक खेळीचे जबर दडपण चीनवर वाढू लागले असून याचे परिणाम येत्या काळात दिसतील. या दोन्ही देशांमधील संबंधांवर याचा परिणाम होईल, पण भारताच्या भूमिकेनंतर चीनच्या डावपेचांची इतर देशांना जाणीव होऊ लागल्याकडे कर्टिस यांनी लक्ष्य वेधले. त्याचबरोबर हिंदी महासागर क्षेत्रातील उगवती शक्ती आणि संरक्षणकर्ता म्हणून भारताचे महत्त्व मोठे असून अमेरिका भारताच्या या उदयाचे समर्थन करीत असल्याचे कर्टिस म्हणाल्या. कर्टिस यांच्याप्रमाणे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्र्यांनी देखील काही दिवसांपूर्वी भारताच्या चीनविरोधी निर्णयांचे समर्थन केले होते.

leave a reply