पाकिस्तानचे लष्कर कराची ताब्यात घेण्याच्या तयारीत

- 'एमक्यूएम'च्या अल्ताफ हुसेन यांचा इशारा

लंडन/कराची – पाकिस्तानी लष्कर व गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ चीनच्या मदतीने कराची शहराला ‘फेडरल टेरेटरी’ घोषित करण्याच्या तयारीत आहे. थोडक्यात पाकिस्तानचे लष्कर कराची ताब्यात घेण्याच्या हालचाली करीत असल्याचा आरोप ‘मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’चे (एमक्यूएम) प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी केला. त्याचवेळी सिंध प्रांतात पाकिस्तानी लष्कर आणि आयएससआयच्या अत्याचाराविरोधात जनतेने जोरदार निदर्शने सुरु केली आहेत.

Pakistan-armyकराचीमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक भागांची दयनीय अवस्था झाली होती. या पावसात शहरात अनेक जणांचा बळी गेला असून इतर समस्यांमुळे जनता त्रस्त झाली होती. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराला ‘क्लिनअप’चे आदेश दिले होते. त्यावरुन पाकिस्तानच्या जनतेने इम्रान खान यांची खिल्ली उडविली होती. लष्कर पावसासाठी नाही तर सुरक्षेसाठी असल्याचा टोला पाकिस्तानी नेटकरांनी पंतप्रधानांना लगावला. पण हे लष्कर कराचीच्या पावसासाठी नाही तर कराची ताब्यात घेण्यासाठी असल्याचा इशारा अल्ताफ हुसेन यांनी दिला.

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने चीनच्या सहाय्याने कराचीवर नियंत्रण मिळविण्याचा डाव आखला आहे. याचा अल्ताफ हुसेन यांनी कडक शब्दात निषेध नोंदविला. तसेच कराचीच्या जनतेने याविरोधात एकत्र येऊन त्याला विरोध करण्याचे आवाहनही अल्ताफ हुसेन यांनी केले.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात कराचीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. कराचीमधली सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती. कराचीचे काही भाग सीलही करण्यात आले होते. जनता घाबरल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, असे स्पष्ट करण्यात आले होते. गेल्या महिन्यात कराचीच्या स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर बलोच बंडखोरांनी हल्ला चढविला होता. त्यानंतर कराचीमधल्या या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अल्ताफ हुसेन यांनी दिलेला इशारा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Pakistanअल्ताफ हुसेन पाकिस्तानी लष्कर व आयएसआयच्या विरोधात आक्रमक होत असतानाच, सिंधची जनताही पेटून उठली आहे. पाकिस्तानचे लष्कर व आयएसआय सिंधमधल्या राजकीय नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे अपहरण घडवून त्यांच्यावर निर्घृण अत्याचार करीत आहेत. याविरोधात तिथल्या जनतेने सिंधमधल्या ‘काझी अहमद टाऊन’मध्ये निदर्शने केली. यात महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता. या निदर्शनात पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात आवाज उठविण्यात आला. या निदर्शनाचे लोण सर्वत्र पसरु नये म्हणून गुप्तचर यंत्रणांनी काहीजणांना ताब्यात घेतले आहे. या निदर्शनात स्वतंत्र सिंधुदेशच्या घोषणादेखील देण्यात आल्या.

leave a reply