भारत- इस्रायलने विकसित केलेल्या कोरोना चाचणी किट्सचे परीक्षण सुरु

- ३० सेकंदात निदान होणार

नवी दिल्ली – भारत – इस्रायलने संयुक्तरीत्या विकसित केलेल्या ‘कोरोनाव्हायरस रॅपिड टेस्टिंग किट’च्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. नवी दिल्लीतल्या डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयामध्ये याचे प्रयोग सुरु आहे. जवळपास चार प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे या चाचण्या घेतल्या जात आहेत. या संशोधनात यश आले तर ३० सेकंदात कोरोनाव्हायरसचे निदान होईल आणि मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्टिंग करता येईल. हे संशोधन मोठी क्रांती ठरेल. जग याची वाट पहात आहे, असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी म्हटले आहे.

भारताच्या ‘संरक्षण संशोधन विकास संस्था’ (डीआरडीओ) आणि इस्रायलच्या ‘डायरेक्टोरेट ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ ने(डीडीआर अँड डी) संयुक्तरित्या कोरोनाव्हायरसवरील संशोधन सुरु केले. यासाठी इस्रायलचे पथक भारतात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयमधील रुग्णांवर या संशोधनाचा प्रयोग सुरु आहे. ब्रेथ अनालयाझर आणि व्हॉईस टेस्टच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चाचण्या सुरु आहेत. साधारण दोन आठवड्यात त्याचे परिणाम दिसतील. त्यात यश आले तर भारत ३० सेकंदात कोरोनाव्हायरसचे निदान करु शकतो.

भारत- इस्रायलने विकसित केलेल्या कोरोना चाचणी किट्सचे परीक्षण सुरु

शुक्रवारी इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी या डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन संशोधकांशी चर्चा केली. कोरोनाव्हायरसची साथ आल्यापासून भारत आणि इस्रायल एकमेकांना सहकार्य करीत आहेत. भारताने इस्रायलला वैद्यकीय मदत पुरविली. हे उत्तम मैत्रीचे प्रतिक आहे. या संशोधनाचे सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर भारतात या किट्सचे उत्पादन होईल. भारत आणि इस्रायलने संयुक्तरित्या विकसित केलेली हे किट जगभरात पोहोचेल, असा विश्वास माल्का यांनी व्यक्त केला.

भारत- इस्रायलने विकसित केलेल्या कोरोना चाचणी किट्सचे परीक्षण सुरु

भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन या संशोधनाचे नेतृत्व करीत आहे. ‘भारत आणि इस्रायलने वैज्ञानिक क्षेत्रात परस्परांना सहकार्य केले आहे. भारत आणि इस्रायलमधील मैत्री या संशोधनामुळे अधिक दृढ होईल. या संशोधनात उभय देशांना यश येईल आणि याचा फायदा देश आणि मानवतेला होईल’, असा विश्वास राघवन यांनी व्यक्त केला.

leave a reply