सौदी अरेबियाच्या ‘ॲराम्को’ इंधनकंपनीला तब्बल १६१ अब्ज डॉलर्सचा नफा

- वर्षभरात तब्बल ४६ टक्क्यांची वाढ

रियाध – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील जनतेला इंधनदरवाढीचा मुकाबला करावा लागत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला इंधनकंपन्यांची आर्थिक स्थिती अधिकाधिक मजबूत होत असल्याचे चित्र समोर येत आहे. सौदी अरेबियाची प्रमुख इंधनकंपनी असणाऱ्या ‘ॲराम्को’ला २०२२ साली तब्बल १६१ अब्ज डॉलर्स इतका नफा झाल्याचे समोर आले. २०२१ सालच्या तुलनेत नफ्यात ४६ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ॲराम्कोच्या एकूण महसुलातही ४९ टक्क्यांची वाढ होऊन तो ५३० अब्ज डॉलर्सवर गेल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. ॲराम्को ही जगातील सर्वात मोठ्या इंधनकंपन्यांपैकी एक म्हणून ओळखण्यात येते.

सौदी अरेबियाच्या ‘ॲराम्को’ इंधनकंपनीला तब्बल १६१ अब्ज डॉलर्सचा नफारशियाने युक्रेनवर हल्ला करण्याआधी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर ८५ डॉलर्स प्रति बॅरल इतके होते. पण रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यानंतर मार्च महिन्यात हेच दर १२७ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियन इंधन व इंधन उत्पादनांवर निर्बंध लादले. त्यामुळे आखाती देशांमधील इंधनाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्याचा फायदा ‘ॲराम्को’सारख्या कंपनीला झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात पाश्चिमात्य इंधनकंपन्यांनाही जवळपास २०० अब्ज डॉलर्सचा नफा झाल्याची माहितीही समोर आली होती.

हिंदी

 

leave a reply