इराण-रशियामध्ये सुखोई-35 विमानांचा खरेदी करार संपन्न

- रशियन वृत्तसंस्थेची माहिती

तेहरान – आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे लक्ष्य ठरलेला इराणने रशियाबरोबर प्रगत सुखोई-35 लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. इराणने खरेदी व्यवहाराच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली. यामुळे जुन्या पिढीतील विमानांचा वापर करणाऱ्या इराणच्या हवाईदलाच्या सामर्थ्यात वाढ होईल, असा दावा इराणच्या वर्तमानपत्राने केला. इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ल्याची योजना आखणाऱ्या इस्रायलसाठी इराण-रशियामधील हे सहकार्य आव्हान ठरू शकते.

इराण-रशियामध्ये सुखोई-35 विमानांचा खरेदी करार संपन्न - रशियन वृत्तसंस्थेची माहिती1980-88 या काळात इराकबरोबर पेटलेल्या ‘फर्स्ट गल्फ वॉर’ अर्थात युद्धानंतर इराणने आपल्या हवाईदलाची सज्जता वाढविण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, इराणने लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत मित्र व सहकारी देशांना आवाहन केले होते. पण अमेरिका, युरोपिय देश व संयुक्त राष्ट्रसंघाने अणुकार्यक्रमावर टाकलेल्या निर्बंधानंतर इराणच्या हवाईदलाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया रखडली होती. या काळात इराणने स्वदेशी बनावटीच्या विमाने तसेच इतर शस्त्रास्त्रांची निर्मिती करून निर्बंधांना उत्तर दिले होते. पण निर्बंधांमुळे जुन्या पिढीतील विमानांचे सुटे भाग देखील मिळणे अवघड झाल्यामुळे इराणच्या हवाई दलाची क्षमता खूपच कमी झाली होती.

पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘रिझोल्युशन 2231’ नुसार 2020 साली परदेशी शस्त्रास्त्रांच्या खरेदीसंदर्भात इराणवर लादलेले निर्बंध हटल्यानंतर रशियाने प्रगत लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव इराणला दिला होता. याबाबतचे सर्व व्यवहार अतिशय गोपनीय ठेवण्यात आले होते. पण आत्ता इराणने रशियाकडून सुखोई-35 या लढाऊ विमानाच्या खरेदीचे व्यवहार पूर्ण केले, अशी माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर सुखोई-35 लढाऊ विमाने इराणच्या हवाईदलासाठी सहाय्यक ठरतील, असे रशियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

इराण-रशियामध्ये सुखोई-35 विमानांचा खरेदी करार संपन्न - रशियन वृत्तसंस्थेची माहितीइराण रशियाकडून किती विमाने खरेदी करणार व ही विमाने इराणच्या हवाईदलात कधी सामील होणार, याचे तपशील रशिया किंवा इराणने दिलेले नाहीत. पण इराण रशियाकडून सुखोई-35 विमाने घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले होते. गेल्या महिन्यात इराणने ‘ईगल 44’ हा आपला पहिला भूमिगत हवाईतळ जगासमोर उघड केला होता. डोंगराखाली दडलेल्या या हवाईतळात लढाऊ विमाने तैनात असल्याची तसेच वेळप्रसंगी ही विमाने छुप्या मार्गाने उड्डाण करून शत्रूवर हल्ले चढवू शकतात, असा इशारा इराणने दिला होता.

दरम्यान, इराणने या भूमिगत हवाईतळाची निर्मिती सुखोई-35 सारख्या मोठ्या रशियन विमानांच्या तैनातीसाठी केल्याचा दावा अमेरिकेतील लष्करी विश्लेषकांनी केला होता. येत्या काळात इस्रायल इराणच्या अणुप्रकल्प तसेच लष्करी ठिकाणांवर हल्ला चढवू शकतो. अशावेळी माघारी परतणाऱ्या इस्रायलच्या विमानांना उत्तर देण्यासाठी इराण सुखोई-35चा वापर करील, असा दावा अमेरिकी विश्लेषकांनी केला होता. त्यामुळे इराण-रशियामध्ये सुखोई-35च्या खरेदीबाबत झालेला करार हा इस्रायलसाठी सावधानतेचा इशारा ठरत आहे.

हिंदी English

 

leave a reply