‘अग्नीपथ’अंतर्गत लष्कराकडून भरतीसाठी अधिसूचना जारी

नवी दिल्ली – ‘अग्नीपथ’ योजनेला देशाच्या काही भागात विरोध सुरू असला, तरी लष्कराने या योजनेअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे भरती संदर्भातील अटीशर्थी, योग्यता, प्रक्रिया याचे तपशील जाहीर केले आहेत. सर्वांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आले असून जुलै महिन्यात ही ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात संरक्षणदलांमध्ये युवकांच्या भरतीसाठी ‘अग्नीपथ’ ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. मात्र या योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या जवानांच्या सेवा कालावधीला घेऊन बरेच आक्षेप पुढे आले होते व ही योजना लष्करात भरती होणाऱ्यांचे भवितव्य अंधारात ढकलणारी असल्याचे आरोप करीत ही योजना मागे घेण्यासाठी हिंसक आंदोलने करण्यात आली.

Agneepathमात्र सरकारने हे आक्षेप वारंवार धुडाकवून लावले असून रविवारी तिन्ही संरक्षणदलांच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत ही योजना मागे घेतली जाणार नसल्याचे व यापुढे अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. या योजनेवर संरक्षणदल 1989 पासून काम करीत असून लष्कराच्या जवानांचे सरासरी वय 32 असून ते 26 पर्यंत खाली आणून लष्कराला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न या योजनेद्वारे केले जात असल्याचे लष्कराने म्हटले होते. तसेच कोणी हिंसक निदर्शनांमध्ये भाग घेतल्याचे आढळल्यास तो लष्करात भरतीस पात्र नसेल. कारण लष्करात शिस्त महत्त्वाची असते. तेथे अशा निदर्शनांना थारा नाही असे स्पष्ट केले होते.

यानंतर दुसऱ्या दिवशीच लष्कराकडून भरतीसंदर्भातील नोटिफीकेशन जारी करण्यात आले आहे. याद्वारे लष्कराने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अग्नीपथ योजनेद्वारे अग्नीवीरांच्या भरतीसाठी जॉईन इंडियन आर्मी या वेब पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. भरती इच्छुक सर्वांना या ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असल्याचे लष्कराने अधिसूचनेमध्ये स्पष्ट केले आहे.

तसेच या चार वर्षानंतर पुन्हा ज्या अग्नीवीरांची निवड होईल त्यांना 15 वर्षांसाठी लष्करी सेवेत घेतले जाणार असल्याचेही लष्कराने म्हटले आहे. याशिवाय अग्नीवीरांना चार वर्ष या विहित कालावधीपूर्वी सेवामुक्ती मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अभियांत्रिकी कॅडर आणि मेडिकल कॅडर वगळता इतर लष्करी जवानांसाठी अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती होईल, असेही अधोरेखित करण्यात आले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भरतीसाठी विविध ठिकाणी शिबिरे होतील. यावर्षी एकूण 83 शिबिरे आयोजित करण्यात येणार असून 40 हजार जवान निवडले जातील. यातील पहिल्या बॅचचे प्रशिक्षण डिसेंबरमध्ये व दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण फेब्रुवारीमध्ये सुरू होईल.

दरम्यान वर्षातून 30 दिवस अग्नीवीरांना सुट्ट्या असतील. तर वैद्यकीय कारणासाठीची सुट्टी ही वैद्यकीय सल्ल्यावर अवलंबून असेल. नियमित जवानांना 90 दिवस सुट्ट्या मिळतात. तसेच अग्नीवीरांच्या पगारातील 30 टक्के रक्कम कॉर्पस म्हणून कापली जाणार असून त्यामध्ये तितकीच रक्कम सरकार टाकणार आहे. त्यामुळे सेवा समाप्ती अखेरीस अग्नीवीरांकडे चांगली जमा असेल.

याआधी कोरोनाच्या संकटाच्या दोन वर्षाच्या काळात रखडलेली भरती पाहता यावर्षापूरते अग्नीपथ योजनेअंतर्गत होणाऱ्या भरतीचे कमाल वय वाढवून 21 वरुन 23 करण्यात आले होते. तसेच संरक्षणविभागासह गृहमंत्रालय व इतर विविध विभागांनी अग्नीवीरांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची घोषणा केली होती. हे सर्व आधीच ठरलेले होते. मात्र या सुविधांबाबत टप्प्या टप्प्याने जाहीर करण्यात येणार होते, असे रविवारी लष्कराच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते.

leave a reply