दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड सहभागी असलेल्या ‘पॅसिफिक समिट’च्या आयोजनाची जपानची तयारी

टोकिओ – पुढच्या आठवड्यात स्पेनची राजधानी माद्रिद येथे नाटोची बैठक आयोजित होत आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बैठकीसाठी नाटोने सहकारी देशांनाही आमंत्रित केले आहे. या निमित्ताने जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या राष्ट्रप्रमुखांची स्वतंत्र बैठक पार पडेल. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर जपान ही बैठक आयोजित करणार असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमे देत आहेत.

japan-korea-aussie-zealandरशिया-युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धाचा फायदा घेऊन चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपल्या कारवाया तीव्र करीत आहे. तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनने योजना तयार केल्याचा ऑडिओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. तर गेल्या आठवड्यात चीनच्या नौदलाने तैवानवर हल्ले चढविण्यासाठी विशेष सराव केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचाली आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची चिंता जपान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर, चीनच्या या आक्रमकतेला रोखण्यासाठी जपान पॅसिफिक समिट आयोजित करणार असल्याची माहिती जपानी माध्यमांनी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली. पंतप्रधान किशिदा नाटोच्या बैठकीच्या निमित्ताने दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर स्वतंत्र बैठक घेऊ शकतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे. दक्षिण कोरियाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल, ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज व न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ॲर्डन यात सहभागी होतील, असा दावा केला जातो.

जपानच्या सरकारने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमक हालचालींविरोधात पंतप्रधान किशिदा लोकशाही देशांना एकत्र आणत असल्याचा दावा जपानी माध्यमे करीत आहेत. गेल्या महिन्यात भारत, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा सहभागअसलेल्या क्वाडच्या बैठकीतही जपानच्या पंतप्रधानांनी चीनविरोधात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाहीवादी देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले होते. यानंतर चीनने जपानवर टीका केली होती.

leave a reply