‘एशियन नाटो’मुळे क्षेत्रात अस्थैर्य माजेल

- अमेरिका व नाटोला चीनचा इशारा

अस्थैर्यन्यूयॉर्क – जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना नाटोच्या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्याची दखल घेऊन चीनने त्यावर जहाल प्रतिक्रिया नोंदविली. ‘आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील नाटोचा सहभाग किंवा नाटोमध्ये या क्षेत्रातील देशांना सामील करून एशियन नाटो उभारण्याच्या हालचालींना चीनचा कडवा विरोध असेल. असे झाले तर या क्षेत्रात अस्थैर्य माजल्यावाचून राहणार नाही’, असा इशारा चीनने दिला आहे.

मंगळवारपासून स्पेनच्या माद्रिद शहरात नाटोची बैठक सुरू झाली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या बैठकीत नाटोच्या सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले आहेत. या बैठकीसाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या राष्ट्रप्रमुखांनाही आमंत्रित करण्यातआले आहे. पहिल्यांदाच हे चारही देश नाटोच्या बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला जातो.

युक्रेन युद्धाबरोबरच चीनकडून झिंजियांग प्रांतात सुरू असलेल्या हत्याकांडाचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित केला जाणार आहे. तर चीनकडून तैवानच्या सुरक्षेला वाढत असलेला धोका यावर नाटोकडून मोठी घोषणा अपेक्षित असल्याचे युरोपिय देशांमधील विश्लेषकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, नाटोने जपान, दक्षिण कोरिया या चीनच्या शेजारी देशांबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांनाही आमंत्रित केल्यामुळे चीन अस्वस्थ बनला आहे.

अस्थैर्य

नाटो आशिया-पॅसिफिक क्षेत्रात आभासी शत्रू निर्माण करीत आहे. यासाठी नाटो या क्षेत्रातील देशांना एकत्र आणून स्वतंत्र संघटना उभारण्याची तयारी करीतआहे. नाटोचे हे प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील चीनचे राजदूत झँग जून यांनी दिला. तर चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सचे माजी संपादक आणि चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे कडवे समर्थक हु शिजीन यांनी दक्षिण कोरियाला थेट शब्दात धमकावले आहे. ‘दक्षिण कोरियाने नाटोत सहभागी होऊन आपल्या शेजारी देशात जाण्याचा मार्ग निवडला तर त्याचे परिणाम युक्रेनसारखे होतील’, असे हु शिजीन यांनी म्हटले आहे.

दक्षिण कोरिया नाटोच्या सायबर गटात सहभागी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दक्षिण कोरियाचे हे पाऊल चीनविरोधी असल्याचा आरोप चीनच विश्लेषक करीत आहेत. काही दिवसांपूर्वी जपानने देखील या गटात सामील होण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे चीन आपल्या हस्तकांचा वापर करून दक्षिण कोरियासह जपानला देखील धमकावत असल्याचा दावा केला जातो. चीनप्रमाणे उत्तर कोरियातील कम्युनिस्ट राजवटीने देखील नाटोच्या बैठकीत जपान व दक्षिण कोरियन नेत्यांच्या उपस्थितीवर ताशेरे ओढले. एशियन नाटोसाठी सुरू असलेले अमेरिकेचे प्रयत्न धोकादायक आणि आपल्याविरोधातील मोठा कट असल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पॅसिफिक बेटदेशांमध्ये आपला लष्करी प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनविरोधात अमेरिकेसह पाच देशांनी ‘पार्टनर्स इन द ब्ल्यू पॅसिफिक’ (पीबीपी) या नव्या गटाची घोषणा केली होती. पॅसिफिक बेटदेशांमधील चीनच्या लष्करी हालचालींना उत्तर देण्यासाठी हा गट उभारल्याचा दावा केला जातो. बायडेन प्रशासनाने ऑकस व्यतिरिक्त पॅसिफिक क्षेत्रात चीनविरोधात उभारलेला हा तिसरा गट ठरतो.

leave a reply