अमेरिका-तैवानमधील व्यापारी चर्चेमुळे चीन अस्वस्थ

व्यापारी चर्चावॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – सोमवारी अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी चर्चेला सुरुवात झाली. अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी तैवानबरोबरील व्यापारी सहकार्य मजबूत करण्यासाठी पावले उचलण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला ‘युएस-तैवान इनिशिएटिव्ह ऑन 21 सेंच्युरी ट्रेड’ची घोषणा करण्यात आली होती. आता थेट चर्चेला सुरुवात करून अमेरिकेने तैवानबरोबरील व्यापाराच्या मुद्यावर पुढाकार घेतल्याचे दिसतेे. अमेरिकेच्या या हालचालींवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अमेरिकेने तैवानशी कोणत्याही परिस्थितीत अधिकृत पातळीवर सहकार्य प्रस्थापित करु नये, असा इशारा चीनने दिला.

गेल्या काही वर्षात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून तैवानविरोधातील कारवायांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात लष्करी व राजनैतिक पातळीसह आर्थिक स्तरावरील दडपणाचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह मित्रदेशांनी तैवानबरोबरील संबंध अधिक भक्कम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच युरोपिय देश तैवानबरोबर विविध पातळ्यांवर करार करून सहकार्य वाढवित आहेत. अमेरिकी संसदेतून तैवानबरोबर मुक्त व्यापारी कराराची मागणी पुढे करण्यात आली आहे.

व्यापारी चर्चाया अनुषंगाने अमेरिकेने तैवानबरोबर व्यापार व गुंतवणूक क्षेत्रात करार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी पार पडलेली चर्चा त्याचाच एक भाग मानला जातो. या चर्चेत अमेरिकेकडून डेप्युटी ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह साराह बिआंची व तैवानकडून वरिष्ठ मंत्री जॉन डेंग सहभागी झाली होते. पुढील काळात अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी करार होण्याची शक्यता ध्यानात घेऊन कृषी, डिजिटल व्यापार, मनुष्यबळ, छोटे व मध्यम उद्योग, सरकारी उपक्रम यासारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.

अमेरिका व तैवानमध्ये झालेल्या या चर्चेवरून चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’चे अनुकरण करून तैवानबरोबर कोणत्याही पातळीवर अधिकृत सहकार्य वाढवू नये, असा इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिला आहे.

leave a reply