म्यानमारमधील दहशतवादी संघटनांना चीनचे सहाय्य

- म्यानमारच्या लष्करप्रमुखांचा आरोप

मॉस्को/नेप्यितौ – म्यानमारच्या उत्तरेकडील प्रांतात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांना चीनकडून सहाय्य मिळत आहे, असा उघड आरोप म्यानमारच्या लष्करप्रमुखांनी केला आहे. एका रशियन वृत्तवाहिनीला नुकताच दिलेल्या मुलाखतीत हा आरोप करताना म्यानमारमधील दहशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहाय्य करावे, असे आवाहनही लष्करप्रमुख जनरल मिन आँग हलँग यांनी केले. कोरोनासह चीनच्या वर्चस्ववादी कारवायांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड रोष असून छोट्या देशांनीही चीनविरोधात आवाज उठवण्यात सुरुवात केली आहे. चीनचा थेट नामोल्लेख टाळून जनरल हलँग यांनी केलेले हे आरोप आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Myanmar-Chinaम्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन आँग हलँग यांनी नुकतीच रशियन वृत्तवाहिनी ‘झ्वेझ्दा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्यानमारमधील ‘आराकान आर्मी’ व ‘आराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी’ या दोन्ही दहशतवादी संघटनांना चीनकडून मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरविण्यात येत असल्याचा आरोप केला. देशात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांना प्रबळ परकीय शक्ती सहाय्य पुरवीत असल्याने म्यानमार एकटा या दहशतवादी संघटनांना पराभूत करू शकत नाही, असे जनरल मिन आँग हलँग यांनी सांगितले.

म्यानमारच्या लष्करप्रमुखांनी कोणत्याही देशाचे थेट नाव घेऊन उल्लेख केला नसला, तरी लष्कराने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांकडे चिनी शस्त्रास्त्रे सापडल्याचे सांगून यामागे चीनच असल्याचे स्पष्ट संकेत दिले. काही महिन्यांपूर्वी एका जपानी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतही, जनरल हलँग यांनी म्यानमार मधील दहशतवादी व बंडखोर संघटनांना चीनकडून शस्त्रास्त्रे पुरवली जात असल्याचा आरोप केला होता.

Myanmar-Armyम्यानमारमधील लष्करी अधिकारी व सूत्रांकडूनही चीनच्या कारवायांना दुजोरा देण्यात आला आहे. हिंदी महासागर क्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी तसेच भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनने दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत म्यानमारमध्ये ही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यात ह्या देशातील खाण, ऊर्जा, वाहतूक व बंदर क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसह इतर उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी म्यानमारवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी चीन दहशतवादी संघटनांचा वापर करीत आहे, असा दावा लष्करी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

Myanmar-Terrorismचीनच्या या दडपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्यानमारने भारताबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्यावर्षी म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन आँग हलँग यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली होती. या भेटीत, दहशतवादविरोधी कारवाई व संरक्षण सहकार्य या मुद्द्यावर चर्चा झाली होती. गेल्या आठवड्यात रशियातील एका कार्यक्रमादरम्यान, म्यानमारच्या लष्करप्रमुखांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची स्वतंत्र भेट घेऊन बोलणी केल्याचेही समोर आले आहे. म्यानमारने आपले पहिली पाणबुडी भारताकडून घेतल्याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.

या पार्श्‍वभूमीवर, म्यानमारच्या लष्करप्रमुखांनी देशातील दहशतवादी कारवायांमागे चीन असल्याचा आरोप करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. हा आरोप म्यानमारसारखे देशही पुढील काळात चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना आव्हान देऊ शकतात याचे संकेत देणारा ठरतो.

leave a reply