पाच राज्यात विधानसभा निवडणुकींची घोषणा

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना यावेळी कोरोनाच्या संकटामुळे राजकीय पक्षांना प्रचारासाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्व आखण्यात आल्याची माहितीही दिली. या पाचही राज्यांचे निवडणूक निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहेत.

तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तीनही राज्यात ६ एप्रिलला मतदान होणार आहे. तर आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल. या राज्यात २७ मार्चला पहिल्या टप्प्यातील, १ एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यातील आणि ६ एप्रिल रोजी तिसर्‍या टप्प्यातील मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

पश्‍चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय आयुक्तांनी जाहीर केले. पश्‍चिम बंगालमध्ये अनुक्रमे २७ मार्च, ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी पहिल्या ते आठव्या टप्प्यातील मतदान होईल.

विधानसभा निवडणूका होत असलेल्या पाच राज्यांपैकी पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक २९४, तमिळनाडूमध्ये २३४ विधानसभेच्या जागा आहेत. याशिवाय केरळमध्ये १४०, आसामध्ये १२६ आणि पुदूचेरीमध्ये ३० जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या पाचही राज्यात मिळून एकूण ८२४ मतदारसंघ असून एकूण १८.६८ कोटी मतदार आहेत. या राज्यांमध्ये मतदानासाठी २ लाख ७० हजार मतदान केंद्र असणार आहे. कोरोनाच्या साथीचे संकट पाहता मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच मतदानाचा कालावधीही एक तासाने वाढविण्यात आला आहे.

कोरोनाचे संकट पाहता उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करायचा असल्यास उमेदवारासह पाचच कार्यकर्त्यांना एकत्र येऊन प्रचार करता येईल. तसेच जमानत रक्कमही उमेदवाराने ऑनलाईन भरायची असून नामांकन करताना दोन जणांना बरोबर येण्याची मुभा आहे.

leave a reply