सिरियातील इराणच्या तळावर अमेरिकेने हवाई हल्ले चढविले

- किमान २२ जण ठार

वॉशिंग्टन – सिरियाच्या पूर्वेकडील देर अल-झोर प्रांतात अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी चढविलेल्या हल्ल्यांमध्ये २२ जण ठार झाले आहेत. येथील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या तळावर अमेरिकेने ही कारवाई केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या कारवाईचे आदेश दिल्याची माहिती पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेऊन महिना उलटल्यानंतर सिरियात ही कारवाई झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

इराकच्या सीमेजवळ असलेल्या सिरियातील ‘अल-बुकमल’ या भागात अमेरिकेने गुरुवारच्या रात्रीपासून ते शुक्रवार पहाटेपर्यंत हल्ले सुरू ठेवले. या हल्ल्यात एकाचा बळी गेल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला होता. पण सिरियातील मानवाधिकार संघटना आणि वैद्यकीय अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान २२ जण ठार झाले आहेत. अल-बुकमल येथील इराणसमर्थक ‘कतैब हिजबुल्लाह’ आणि ‘कतैब सईद अल-शुहादा’ या दोन दहशतवादी संघटनांचे तळ या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याचे मानवाधिकार संघटनेने सांगितले. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी सिरियात अमेरिकेने चढविलेल्या हल्ल्याची माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सिरियातील इराणसंलग्न दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे किरबाय म्हणाले. तसेच इराकमधील अमेरिकी आणि मित्रदेशांच्या जवानांवर होणार्‍या हल्ल्यांनाही राष्ट्राध्यक्ष बायडेन लवकरच प्रत्युत्तर देतील, अशी माहिती किरबाय यांनी दिली. तर सिरियातील अमेरिकेची ही कारवाई इराणला इशारा देणारी होती, अशी माहिती अमेरिकी अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेऊन महिना लोटला आहे. या महिनाभराच्या काळात बायडेन यांनी सिरिया किंवा इराकमधील इराणचे तळ व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांबाबत बोलण्याचे टाळले होते. गेल्या दोन आठवड्यात इराकमधील अमेरिकेचे जवान, लष्करी तळ आणि दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्यांबाबतही बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अणुकरारावर चर्चा करण्याच्या तयारीत असलेल्या बायडेन यांनी इराणबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याची टीका सुरू झाली होती. अशा परिस्थितीत, शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सिरियात चढविलेल्या हल्ल्यांवर आश्‍चर्य व्यक्त केले जाते.

दरम्यान, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सिरियातील या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित केला आहे. खरोखरच इराणच्या तळांवर हवाई हल्ले चढविले की मोकळ्या मैदानात क्षेपणास्त्रे डागण्यात आली? असा खोचक प्रश्‍न पॉम्पिओ यांनी केला. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेने सिरियात इराणच्या तळांवर केलेल्या कारवाईवर बायडेन यांनी ताशेरे ओढले होते. त्यावेळी बायडेन व त्यांच्या समर्थकांनी सिरियाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. त्याचा दाखला देऊन शुक्रवारी सिरियात हल्ला चढविणार्‍या बायडेन आणि व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांना आपल्या आधीच्या भूमिकेचा विसर पडला आहे का, असा सवाल अमेरिकेतील माध्यमे व नागरिक विचारत आहेत.

leave a reply