जगभरात अनिश्‍चितता वाढत असताना संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरता अनिवार्य बनली आहे

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

जैसलमेर – ‘साऊथ चायना सी असो हिंदी महासागर क्षेत्र असो की इंडो-पॅसिफिक किंवा मध्य आशियाई क्षेत्र असो, सर्वत्र अनिश्‍चितता वाढत चालली आहे. जागतिक पातळीवर झपाट्याने बदल होत असून अनपेक्षित घटना समोर येत आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडी हे या अनिश्‍चिततेचा दाखला देणारे उदाहरण ठरू शकते. अशा काळात विविध देश आपले हितसंबंधांनुसार निर्णय घेत आहेत. त्यामुळे संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरता ही आता भारतासाठी पर्याय नाही तर ती अनिवार्यता बनलेली आहे’, असे लक्षवेधी उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काढले आहेत.

जमिनीतून हवेत मारा करणार्‍या मध्यम पल्ल्याच्या ‘एमआरसॅम- मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल’च्या वायुसेनेतील सहभागाचा कार्यक्रम राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला. भारताच्या डीआरडीओ व इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज्च्या सहकार्याने ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे वायुसेनेत सहभागी करण्यात आली असून राजस्थानमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीपासून इंडो-पॅसिफिक तसेच मध्य आशियाई क्षेत्रापर्यंतच्या क्षेत्रात सुरू असलेल्या वेगवान घडामोडींचा दाखला दिला.

जगभरातील भू-राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. अशा परिस्थितीत देश आपल्या हितसंबंधांनुसार निर्णय घेत आहेत. अशा काळात भारतासाठी आत्मनिर्भरता हा पर्याय नसून ती अनिवार्यता बनली आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी एमआरसॅमसाठी भारताला इस्रायलने सहकार्य केले व ही बाब दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक व्यापक सहकार्य अधोरेखित करणारी ठरते, असे संरक्षणमंत्री पुढे म्हणाले. इस्रायलने याआधी १९९९ सालच्या कारगिल युद्धात भारताला सहकार्य केले होते. त्याच्याही आधी १९७१ सालच्या बांगलादेश युद्धात भारताला इस्रायलचे सहकार्य मिळाले, याची आठवण संरक्षणमंत्र्यांनी केली.

अशारितीने कारगिल युद्ध व बांगलादेशची निर्मिती करणार्‍या पाकिस्तानबरोबरील १९७१ सालच्या युद्धात भारताला इस्रायलचे सहकार्य मिळाले होते, ही बाब भारताने जाहीर केली नव्हती. पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही घोषणा करून सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, आत्ताच्या काळात संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरतेला प्रचंड प्रमाणात महत्त्व आले असून यामुळे देश अधिक बलशाली होईल, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच तीस वर्षांपूर्वी देशाच्या स्वतंत्र क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे ध्येय समोर ठेवणारे देशाचे द्रष्टे वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या अफाट योगदानाची संरक्षणमंत्र्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

देशात संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांची निर्मिती वेग पकडत असून याची इतर देशांना निर्यात सुरूही झालेली आहे, याचा दाखला देऊन त्यावर संरक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांच्या आयातीत भारत क्रमांक एकचा देश होता. पण आता भारत सुरक्षा यंत्रणा निर्यात करू लागला आहे. पुढच्या काळात भारताचे संरक्षणक्षेत्र आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहिल, अशी ग्वाही यावेळी संरक्षणमंत्र्यांनी दिली.

leave a reply