बुर्किना फासोतील हल्ल्यात किमान 100 जण ठार

Burkina-Faso-rebel-attackऔगादौगो – बुर्किना फासो या आफ्रिकी देशामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी चढविलेल्या हल्ल्यात किमान 100 जणांचा बळी गेला. या हल्ल्यामुळे हादरलेल्या शेकडो स्थानिकांनी पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. कुठल्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण अल कायदा आणि आयएसशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनांनी हा हल्ला घडविल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो. दरम्यान, बुर्किना फासोतील या हल्ल्यानंतर टोगो या शेजारी देशाने सीमेजवळ इमर्जन्सी घोषित केली. तर नायजरने आपल्या लष्कराला अलर्टवर ठेवले आहे.

उत्तरेकडील सेनो प्रांतातील सेयतेंगा भागात हा हल्ला झाला. शनिवारच्या मध्यरात्री मोटारी व बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी येथील पुरुष, महिला आणि मुलांना वेगळे काढून गोळीबार केला. महिला व मुलांना वगळून हल्लेखोरांनी गावांमधील पुरुषांना ठार केले. या हल्ल्यातील बळींच्या संख्येबाबत निरनिराळे दावे स्थानिक माध्यमे व प्रशासन करीत आहे. किमान 100 जणांचा बळी गेल्याचा दावा सुरक्षा अधिकाऱ्याने केला. पण ही संख्या 165 इतकी असू शकते, असेही माध्यमांचे म्हणणे आहे. यापैकी 55 जणांचे मृतदेह हाती आले असून घराघरात जाऊन मृतदेहांची पाहणी होत आहे.

Burkina-Faso-rebelsया हल्ल्यानंतर या भागातील किमान तीन हजार जण विस्थापित झाले आहेत. त्यांनी दोरी शहरात आश्रय घेतला आहे. या शहरात मानवाधिकार संघटनांची उपस्थिती असल्यामुळे इथे विस्थापितांवर उपचार होत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपिय महासंघाने बुर्किना फासोतील या हत्याकांडाची कठोर शब्दात निर्भत्सना केली. गेल्या आठवड्यात सेयतेंगा भागात बंडखोर आणि लष्करामध्ये संघर्ष भडकला होता. त्यामुळे बंडखोरांनी हा हल्ला चढवून बुर्किना फासोच्या लष्कराला इशारा दिल्याचा दावा केला जातो.

पण या भीषण हत्याकांडासाठी अल कायदा किंवा आयएस या दोन दहशतवादी संघटनांशी संलग्न असलेले गट जबाबदार असण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. यापैकी सेयतेंगाच्या सीमेजवळ अल कायदा आणि आयएससंलग्न दहशतवादी संघटनांचे तळ असल्याचा दावा केला जातो. याआधी या भागातील दहशतवाद्यांनी हल्ले चढविल्याचे उघड झाले होते. त्यामुळे दोन्ही दहशतवादी संघटनांशी हे हल्ले जोडले जात आहेत.

Burkina-Faso2015 सालापासून बुर्किना फासो, नायजर, माली या साहेल प्रांतातील देशांमध्ये दहशतवादी संघटनांनी घडविलेल्या हिंसाचारात हजारो जणांचा बळी गेला तर लाखोजण विस्थापित झाले आहेत. बुर्किना फासोतील सरकार हा हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका नागरिकांनी सुरू केली होती. अशा परिस्थितीत, यावर्षी जानेवारी महिन्यात लष्कराने बंड पुकारुन देशातील सरकार उधळले व सत्तेचा ताबा घेतला. त्यानंतर बुर्किना फासोमध्ये लेफ्टनंट कर्नल पॉल-हेन्री सँडोगो दामिबा यांचे सरकार आहे.

पण गेल्या चार महिन्यांमध्ये बुर्किना फासोतील हिंसाचारात अजिबात फरक पडलेला नाही. गेल्या आठवड्यात या देशातील दहशतवाद्यांनी 11 जवानांना ठार केले होते. यानंतर बुर्किना फासोच्या जनतेने आणि राजकीय पक्षांनी दहशतवाद्यांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या लेफ्टनंट कर्नल दामिबा यांच्या राजवटीवर सडकून टीका केली होती.

leave a reply