इराकमधील दुहेरी आत्मघाती स्फोटांमध्ये ३२ जणांचा बळी

बगदाद – इराकची राजधानी बगदादमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या दुहेरी आत्मघाती हल्ल्यांमध्ये किमान ३२ जणांचा बळी गेला, तर शंभरजण जखमी झाले आहेत. यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा इराकी सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. तर ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविल्याचा संशय इराकी लष्कर व्यक्त करीत आहेत. दरम्यान, अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर इराकमध्ये ‘आयएस’ने स्फोट घडविल्याचे लक्षात आणून दिले जात आहे.

गुरुवारी सकाळी इराकची राजधानी आत्मघाती हल्ल्यांनी हादरली. बगदादच्या बाब अल-शर्की शहरात पहिला आत्मघाती हल्ला झाला. दहशतवाद्याने आजारी वाटत असल्याचे नाटक करून आपल्या जवळ गर्दीला बोलाविले व त्यानंतर स्फोट घडविला. या स्फोटात मोठ्या संख्येने नागरिक मारले गेल्याची माहिती इराकच्या अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने दिली. यानंतर या स्फोटात जखमी झालेल्यांना सहाय्य करण्यासाठी गर्दी जमा होऊ लागल्यानंतर तिथेच उभ्या असलेल्या दुसर्‍या आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडविला. त्यामुळे या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढली असून जखमी देखील गंभीरावस्थेत असल्याचे इराकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

गेल्या काही महिन्यानंतर इराकमध्ये एवढा भीषण आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण अशाप्रकारच्या हल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘आयएस’वर संशय व्यक्त केला जातो. इराकमध्ये पुन्हा घातपात घडवून ‘आयएस’ आपली दहशत वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या संघटनेने गुरुवारी हे हल्ले घडविल्याचा दावा केला जातो. इराकी लष्कराने देखील आपल्या कारवाईत ‘आयएस’चे जबर नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

इराकमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकार्‍यांनी या हल्ल्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच या हल्ल्यामुळे इराकमध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना हादरा बसू शकतो, अशी भीती राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त अमेरिका, इजिप्त, जॉर्डन आणि तुर्कीने देखील इराकमधील या दुहेरी आत्मघाती स्फोटांची कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे. सध्या इराकमध्ये निवडणूकीच्या हालचाली सुरू आहेत. इराणसमर्थक गट व इराकमधील राष्ट्रवादी गट यांच्यात ही स्पर्धा सुरू असल्याचा दावा केला जातो. अशावेळी दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविल्याचे इराकी माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराकमधील आपल्या सैन्यसंख्येत कपात केली आहे. सध्या इराकमध्ये अमेरिकेचे जेमतेम अडीच हजार जवान तैनात आहेत. अमेरिकेच्या या सैन्यमाघारीनंतर दहशतवाद्यांनी इराकमध्ये हे स्फोट घडविल्याचा दावा केला जातो.

leave a reply