‘कोविशिल्ड’ बनविणार्‍या ‘सिरम’च्या पुण्यातील प्रकल्पाला भीषण आग -पाच जणांचा बळी

पुणे – ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’चे उत्पादन घेणारी भारतीय कंपनी ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑङ्ग इंडिया’च्या पुण्यामधील प्रकल्पाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत पाच जणांचा बळी गेला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पाच दिवसांपूर्वी देशात कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर या आगीचे वृत्त चिंता वाढविणारे ठरले आहेे. ही आग शॉटसर्किटमुळे आगल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी यामागे घातपाताचे कारस्थान आहे का  यादृष्टीनेही तपास करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

गुरुवारी दुपारी ‘सिरम’च्या पुण्यातील प्रकल्पाच्या आवारातील एका इमारतीला भीषण आग लागली. सुरूवातील ही आग ‘कोविशिल्ड’ बनविणार्‍या आणि या लसी ठेवण्यात आलेल्या इमारतीला लागल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र ‘कोविशिल्ड’चे उत्पादन घेणार्‍या प्रकल्पाची इमारत सुरक्षित असून प्रकल्पाच्या आवारातील दुसर्‍या इमारतीला आग लागल्याचे ‘सिरम’तर्फे सांगण्यात आले. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यापासून आग पसरण्यास सुरूवात झाली आणि लगेचच आगीने भीषण रुप घेतले. या इमारतील ‘बीसीजी’ लसींचा साठा करण्यात आला होता. तसेच इमारतीमध्ये बांधकाम सुरू होते.

इमारतीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचा दावा ‘सिरम’तर्फे करण्यात आला होता. मात्र अग्नीशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्यावर इमारतीत पाच जणांचे मृतदेह आढळले. ‘सिरम’कडून या भीषण आगीत बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना २५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र हे मृतदेह कामगारांचे आहेत का सिरमच्या कर्मचार्‍यांचे याची ओळख अद्याप पटलेली नाही. कारण या मृतदेह ओळख पटविण्याच्या स्थितीत नाहीत.

ही आग शॉर्टसक्रीटमुळे किंवा येथे सुरू असलेल्या वेल्डींगच्या कामामुळे ठिणगी पडून लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचवेळी यामागे घातपाताचे कारस्थान असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर यंत्रणाही तपास करीत आहेत, अशी बातमी आहे.

leave a reply