माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचे अमेरिकेतील दांभिक उदारमतवाद्यांवर टीकास्त्र

वॉशिंग्टन – ‘दांभिकपणा, बहुसांस्कृतिकतेचा मुद्दा यासह सगळे वाद ही काही अमेरिकेच्या अस्तित्त्वाची ओळख नाही. या सगळ्या गोष्टी अमेरिकेचा पाया खिळखिळा करणार्‍या आहेत. अमेरिका यामुळे कमकुवत होऊ शकते, याची कल्पना असणारे शत्रू त्याचा फायदा उचलून देशातील विघटनवादाला प्रोत्साहन देतील’, असे टीकास्त्र अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सोडले आहे. पॉम्पिओ यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील प्रसारमाध्यमे व सोशल मीडियालाही धारेवर धरल्याचे समोर आले होते.

गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटस् पक्षाचे ज्यो बिडेन यांना विजय मिळाला असून, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आघाडी कायम राखण्यातही पक्ष यशस्वी ठरला आहे. गेल्या काही वर्षात या पक्षात डाव्या व समाजवादी विचारसरणीच्या धोरणांचा पुरस्कार करणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णियांवर होणारी कारवाई, निर्वासितांचे लोंढे, शस्त्र बाळगण्याचा अधिकार(गन राईट्स), पर्यावरण, समानता यासारख्या मुद्यांवर या गटाकडून टोकाची भूमिका घेण्यात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर पॉम्पिओ यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘सेन्सॉरशिप, दांभिकपणा, इतरांची राजकीय विचारसरणी सुधारण्याचा किंवा त्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी एकाच दिशेकडे जाणार्‍या आहेत. ही दिशा एकाधिकारशाहीची असून, ती नैतिक प्रामाणिकपणाच्या आड लपलेली आहे’, असा दावाही माजी परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

गेल्याच महिन्यात रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्या निक्की हॅले यांनीही अमेरिकेतील बदलत्या विचारधारांकडे लक्ष वेधले होते. ‘ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिका सामाजिक समस्यांचे तथाकथित भान असणार्‍या डाव्या विचारसरणीच्या गटाच्या ताब्यात जाईल. ही संपूर्ण अमेरिकेसाठी अत्यंत चिंतेची बाब ठरते’, असे हॅले यांनी बजावले होते. अमेरिकेच्या राजकीय विचारधारेत समाजवाद मुख्य प्रवाहात आला आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता.

leave a reply