टेक्सासमधील हल्ल्यामुळे पाकिस्तानचे दहशतवाद्यांबरोबर संबंध जगासमोर आले

- परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला

नवी दिल्ली – अमेरिकेच्या टेक्सास राज्यात ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे दहशतवाद्यांबरोबरील संबंध पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहेत, असे भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला म्हणाले. त्याचवेळी दहशतवाद्यांच्या नेटवर्क विरोधात सार्‍या जगाने सुस्पष्ट भूमिका स्वीकारावी, असे आवाहन परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी केले.

टेक्सासमधील हल्ल्यामुळे पाकिस्तानचे दहशतवाद्यांबरोबर संबंध जगासमोर आले - परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगलाओआरएफ-एनएमएफ-केएएस या अभ्यासगटांनी आयोजित केलेल्या ‘इंडिया-ईयू अँड इंडिया-जर्मनी इन द इंडो पॅसिफिक रिजन’ या विषयावरील चर्चासत्रात परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी सहभाग घेतला होता. व्हर्च्युअल माध्यमाद्वारे त्यांनी यावेळी दिलेल्या व्याख्यानात अमेरिकेच्या टेक्सास राज्यात झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. भारताच्या शेजारी असलेला पाकिस्तान हा देश जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे. जागतिक दहशतवादाचे नेटवर्क पाकिस्तानात आहे, अशी घणाघाती टीका यावेळी श्रिंगला यांनी केली.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या या नेटवर्कचे जबरदस्त परिणाम पुढच्या काळात समोर येतील. ही जागतिक समस्या आहे. याच्या विरोधात कुठलाही आडपडदा न ठेवता, प्रभावी व सुस्पष्ट तसेच एकजुटीने कारवाई करणे भाग आहे, असे आवाहन यावेळी परराष्ट्र सचिवांनी केले. टेक्सास येथे ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर पकिस्तानी वंशाचा कट्टरवादी मलिक अक्रम याने हल्ला चढविला होता. यावेळी त्याने चारजणांना ओलीस दरून पाकिस्तानची कुख्यात दहशतवादी अफिया सिद्दिकी हिच्या सुटकेची मागणी केली होती.

अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने अक्रम याला ठार करून ओलिसांची सुटका केली खरी. पण यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी ही बाब अधोरेखित करून पुन्हा एकदा पाकिस्तानातून जगभरात निर्यात केल्या जाणार्‍या या दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारण्याची आवश्यकता असल्याची जाणीव करून दिली. दहशतवादाच्या समर्थनार्थ पुढे केली जाणार्‍या कारणांकडे लक्ष देऊन दहशतवादाकडे जगाला दुर्लक्ष करता येणार नाही, असे श्रिंगला पुढे म्हणाले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कुठल्याही प्रकारे दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत नुकतेच म्हटले होते. त्याची आठवण श्रिंगला यांनी करून दिली.

leave a reply