चीनला रोखण्यासाठी भारत आणि जर्मनीला रशियाची आवश्यकता आहे

- जर्मनीचे नौदलप्रमुख के-अचिम शॉनबाच

नवी दिल्ली – चीनच्या विरोधात भारत आणि जर्मनीला रशियाची आवश्यकता आहे. रशियामध्ये लोकशाही नसली तरी भारत व जर्मनीसाठी रशियाचे फार मोठे महत्त्व आहे. रशियाच्या नैसर्गिक स्त्रोतांवर चीन अवलंबून आहे. त्यामुळे रशियाला चीनपासून दूर ठेवणसाठी भारत आणि जर्मनी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, अशा थेट शब्दात जर्मनीचे नौदलप्रमुख के-अचिम शॉनबाच यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली. तर इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत जर्मनीच्या नव्या सरकारने स्वीकारलेल्या भूमिकेचे भारताने स्वागत केले आहे.

चीनला रोखण्यासाठी भारत आणि जर्मनीला रशियाची आवश्यकता आहे - जर्मनीचे नौदलप्रमुख के-अचिम शॉनबाचजर्मनीचे नौदलप्रमुख शॉनबाच भारताच्या भेटीवर आहेत. जर्मनीत नवे सरकार सत्तेवर आले आहे. आधीच्या सरकारपेक्षा जर्मनीच्या या नव्या सरकारची भूमिका वेगळी असल्याचे नौदलप्रमुख शॉनबाच यांच्या भारतभेटीत स्पष्ट झाले. जर्मनीने आता चीनच्या विरोधात स्पष्ट भूमिका स्वीकारली आहे. त्याचवेळी रशियाबाबतची आपली भूमिकाही जर्मनी ठामपणे मांडत आहे. नवी दिल्लीत ‘इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज् अँड अनॅलिसिस-आयडीएसए’ या अभ्यासगटासमोर बोलताना जर्मन नौदलप्रमुखांनी आपल्या सरकारचे धोरण परखड शब्दात मांडले.

जर्मन नौदलाची विनाशिका भारताच्या भेटीवर असून भारतीय नौदलाबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी आपला देश उत्सूक असल्याचे जर्मनीचे अधिकारी सांगत आहेत. त्याचवेळी जर्मन नौदलप्रमुखांच्या या भारतभेटीत त्यांनी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांची भेट घेतली होती. जर्मनीच्या नव्या सरकारने इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत अधिक सक्रीय भूमिका स्वीकारली आहे. याचे परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी स्वागत केले. तर ‘आयडीएसए’मधील आपल्या व्याख्यानात जर्मनीच्या नौदलप्रमुखांनी आपल्या देशाची भूमिका व धोरण अगदी स्पष्ट शब्दात मांडले.

आफ्रिका खंडातील देशांना चीन आपल्या कर्जाच्या फासात अडकवत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया चिंताजनक ठरतात, असे जर्मनीचे नौदलप्रमुख म्हणाले. आपल्या देशातील एका राजकीय नेत्याने केलेल्या विधानांचा दाखला यावेळी जर्मनीच्या नौदलप्रमुखांनी दिला. सध्या चीन जे काही करीत आहे, ते पाहता हा देश तितकासा चांगला नाही, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे, असे हे जर्मनीचे नेते म्हणाले होते. नौदलप्रमुख शॉनबाच यांनी त्यांच्याच विधानाचा दाखला देऊन चीनपासून असलेला धोका अधोरेखित केला.

चीनचे बळ कमी करायचे असेल तर मग रशियाला चीनपासून दूर करावे लागेल. म्हणूनच भारत व जर्मनीसाठी रशिया हा महत्त्वाचा देश ठरतो. रशियाच्या नैसर्गिक स्त्रोतांवर चीन बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे, हे लक्षात घेऊन भारत व जर्मनीने रशियाबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी पावले टाकावी, असे नौदलप्रमुख शॉनबाच यांनी म्हटले आहे. रशिया व जर्मनीमध्ये ‘नॉर्ड स्ट्रीम टू’ हा इंधन करार संपन्न झाला असून लवकरच हा प्रकल्प तडीस जाईल, असे दावे केले जातात. मात्र अमेरिकेने याला कडाडून विरोध केला असून काही युरोपिय देश देखील याच्या विरोधात गेले आहेत.

अशा परिस्थितीत जर्मनी चीनला रोखण्यासाठी रशियाबरोबरील सहकार्य अत्यावश्यक असल्याचे लक्षात आणून देत आहे. भारतानेही ही बाब वेगवेगळ्या मार्गाने अमेरिकेला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारत व जर्मनीची यासंदर्भातील भूमिका एकसमान असल्याचे समोर येत आहे. नौदलप्रमुख शॉनबाच यांनी थेट शब्दात ही मांडणी करून अमेरिकेसह युरोपातील रशियाविरोधी देशांना याची जाणीव करून दिल्याचे दिसते.

leave a reply