पुरवठा साखळीवरील हल्ल्यामुळे नवे शीतयुद्ध भडकू शकते

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – कोरोनाची साथ व त्यानंतर पेटलेले युक्रेनचे युद्ध, यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील त्रुटी जगासमोर आल्या आहेत. यानंतर उत्पादनाशी निगडित असलेल्या सध्याच्या पुरवठा साखळीचा पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. यासाठी अधिक किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत विविध देशांमधील मध्यमवर्गाकडून वसूल केली जाईल. त्याचे विपरित परिणाम होतील. त्यामुळे पर्यायी पुरवठा साखळीवर काम करीत असताना, या धोक्यावर शांतपणे विचार करण्याची गरज आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तलिना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे. जागतिक उत्पादनाचे केंद्र असलेल्या चीनमधील पुरवठा साखळीला आव्हान दिल्यास त्याने नवे शीतयुद्ध पेट घेईल, असे जॉर्जिवा वेगळ्या शब्दात सांगत आहेत. त्याचवेळी जगाला नवे शीतयुद्ध परवडणारे नसेल, असा दावा जॉर्जिवा यांनी केला आहे. तीन दिवसांपूर्वी ‘जी७’ देशांच्या अर्थमंत्र्यांची विशेष बैठक पार पडली होती. अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी याचे नेतृत्व केले होते. कोरोनाव्हायरस आणि युक्रेनच्या युद्धामुळे प्रभावित झालेल्या जागतिक पुरवठा साखळीला पर्याय देण्यावर चर्चा पार पडली होती. यासाठी विकसनशील देशांना सोबतीला घेऊन उत्पादनाशी निगडित पर्यायी पुरवठा साखळी उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

पुरवठा साखळीवरील हल्ल्यामुळे नवे शीतयुद्ध भडकू शकते - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा‘जी७’ देशांनी थेट उल्लेख केला नसला तरी पुरवठा साखळीसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले होते. त्याचबरोबर चीनला पर्याय देणारी पुरवठा साखळी उभारण्याचे यात ठरले होते. दुर्मीळ खनिज संपत्ती, सेमीकंडक्टर्स तसेच इतर महत्त्वाच्या उत्पादनांसाठी एकाच देशावर विसंबून न राहता इतर पर्यायांचा शोध घेण्याची घोषणा या बैठकीत करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

जी७ देशांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिवा यांनी चिंता व्यक्त केली. पर्यायी पुरवठा साखळीसाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते. या प्रयत्नात अपयश मिळाले तर त्यामुळे परिस्थिती बिघडेल आणि प्रत्येक देशातील मध्यमवर्गीयांना याची किंमत मोजावी लागू शकते, असा इशारा जॉर्जिवा यांनी दिला. त्यामुळे तडकाफडकी निर्णय न घेता शांत डोक्याने विचार करावा लागेल, असे नाणेनिधीच्या प्रमुखांनी सुचविले.

भूराजकीय तणावात वाढ होत असताना पुरवठा साखळी संबंधीच्या निर्णयाचे परिणाम जागतिक व्यापारावर होतील. त्यामुळे आर्थिक स्थैर्याला असलेला धोका वाढेल आणि आर्थिक उत्पादनात मोठी घट होईल, असा दावा जॉर्जिवा यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जॉर्जिवा यांनीदेखील जागतिक अर्थव्यवस्था कमी विकासदराने प्रगती करील, असे बजावत आहेत. चीनप्रणित पुरवठा साखळीला निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जॉर्जिवा हा इशारा देत होत्या, असे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply