जपानचे पंतप्रधान किशिदा स्फोटातून थोडक्यात बचावले

- हल्लेखोराला अटक

टोकिओ – स्थानिक निवडणूक प्रचारात सहभागी झालेले जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा बॉम्बस्फोटातून बचावले. हल्लेखोर पंतप्रधान किशिदा यांच्यावर ‘स्मोक बॉम्ब’चा हल्ला करण्याच्या तयारीत असताना पंतप्रधानांच्या अंगरक्षकांनी हल्लेखोराला वेळीच अटक केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नऊ महिन्यांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान ॲबे शिंझो यांची प्रचारसभेतच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

जपानचे पंतप्रधान किशिदा स्फोटातून थोडक्यात बचावले - हल्लेखोराला अटकशनिवारी वाकायामा प्रांतातील सैकझाकी बंदर शहरात स्थानिक निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान किशिदा दाखल झाले होते. स्थानिकांच्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोराने किशिदा उभे असलेल्या मंचाच्या दिशेने चांदीच्या रंगाची नळकांडी फेकली. त्याबरोबर अंगरक्षकांनी पंतप्रधान किशिदा यांच्याभोवती संरक्षित कडे करुन त्यांना मंचावरुन दूर नेले. तर साध्या वेषातील पंतप्रधानांचे अंगरक्षक आणि पोलिसांनी हल्लेखोराला वेळीच पकडले. त्याच्याकडून आणखी एक स्फोटक हस्तगत करण्यात आले.

पंतप्रधान किशिदा यांना लक्ष्य करण्यासाठी हल्लेखोराने ‘स्मोक बॉम्ब’चा वापर केला होता. यातून बचावलेल्या किशिदा यांनी पुढच्या टप्प्यातील प्रचाराची सुरुवात केली. तर हल्लेखोराची ओळख पटली असून यामागील उद्देशाचा तपास सुरू आहे. नऊ महिन्यांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान ॲबे यांच्यावर प्रचारसभेतच गोळीबार झाला होता. माजी पंतप्रधान ॲबे यांच्याप्रमाणे विद्यमान पंतप्रधान किशिदा हे सत्ताधारी ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’चे सदस्य आहेत. सत्ताधारी पक्षावरील असंतोष म्हणून हे हल्ले केले जात असल्याचा दावा केला जातो. पण आक्रमक संरक्षण धोरण राबविणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

हिंदी

 

leave a reply