नातांझ अणुप्रकल्पातील हल्लेखोराची ओळख पटली

- इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीचा दावा

तेहरान – इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात स्फोटके पेरून मोठा स्फोट घडविणार्‍या संशयिताची ओळख पटली आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने संशयिताचा फोटो प्रसिद्ध केला असून सदर हल्लेखोर इराण सोडून फरार झाल्याचे जाहीर केले. इराणी वृत्तवाहिनीने हल्लेखोराबाबत प्रसिद्ध केलेल्या या माहितीत बर्‍याच गफलती असल्याचा दावा इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. दरम्यान, नातांझ प्रकल्पातील स्फोटात सेंट्रिफ्यूजेसचे मोठे नुकसान झाले असून यामुळे इराणचा अणुकार्यक्रम नऊ वर्षांनी मागे गेल्याचे बोलले जाते.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षांच्या रेझा करिमी याने नातांझ प्रकल्पात स्फोटके पेरली होती. इराणमध्ये जन्म झालेला करिमी स्फोट होण्याच्या आधी देश सोडून परागंदा झाला. करिमीच्या नावे इंटरपोलने ‘रेड नोटीस’ जारी केल्याचेही इराणी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले. त्याचबरोबर करिमीला अटक करून इराणमध्ये आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे म्हटले आहे.

पण सरकारी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या या माहितीवर इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मूलभूत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. रेझा करिमी याने स्फोटके पेरली असतील, तर मग त्याला कडेकोड सुरक्षा असलेल्या प्रकल्पात प्रवेश कसा मिळाला? याशिवाय इंटरपोलच्या अधिकृत संकेतस्थळावरील डाटाबेसमध्ये करिमीच्या अटकेसंबंधी रेड नोटीस दिसत नाही. तर मग इराणी वृत्तवाहिनीने करिमीच्या नावाने प्रसिद्ध केलेली इंटरपोलची रेड नोटीस खरी कशी काय मानायची, असे प्रश्‍न आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केले आहेत.

त्याचबरोबर करिमीविषयी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये नातांझ प्रकल्पाच्या हॉलमधील सेंट्रिफ्यूजेसचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अणुप्रकल्पातील स्फोटात सेंट्रिफ्यूजेसचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य आहे का? असा प्रश्‍नही विचारला जात आहे. सरकारी वृत्तवाहिनीने रेझा करिमी या संशयिताबाबत प्रसिद्ध केलेल्या या माहितीबाबत इराणच्या सरकारने खुलासा केलेला नाही. त्याचबरोबर अणुप्रकल्पातील स्फोटात फारसे नुकसान झाले नसल्याचे इराणचे नेते वारंवार सांगत आहेत.

गेल्या रविवारी इराणच्या नातांझ या अतिशय महत्त्वाच्या अणुप्रकल्पात अचानक ब्लॅकआऊट झाला. सुरुवातीला हा एक अपघात असल्याचे दावे करणार्‍या इराणने दुसर्‍याच दिवशी प्रकल्पातील अपघातासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. हा इस्रायलचा आण्विक दहशतवादी असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी केला. त्यानंतर अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने नातांझ प्रकल्पात मोठा स्फोट झाला असून यात इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोझ कमालवंदी गंभीर जखमी झाल्याचे जाहीर केले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कमालवंदी यांचे फोटोग्राफ्सही यानिमित्ताने समोर आले.

गेल्या वर्षी देखील नातांझ अणुप्रकल्पाच्या एका भागात संशयास्पदरित्या स्फोट होऊन आग लागली होती. यामध्ये सदर भागाचे मोठे नुकसान झाले होते. तर याआधी २०१० साली याच अणुप्रकल्पावर झालेल्या स्टक्सनेट व्हायरसच्या सायबर हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पातील हजाराहून अधिक सेंट्रिफ्यूजेस नष्ट झाले होते. या दोन्ही हल्ल्यांसाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले होते.

leave a reply