जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अमली पदार्थ तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला

- तीन पाकिस्तानी घुसखोर ठार - १८० कोटींचे अंमली पदार्थ जप्त

जम्मू – जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरून अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा कट सुरक्षादलांनी उधळून लावला. अमली पदार्थ घेऊन घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या तिघा पाकिस्तानी घुसखोरांना बीएसएफच्या जवानांनी ठार केले. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकार्‍याने दिली आहे. येथून १८० कोटी रुपयांचे अमली पदार्थ शस्त्र व पाकिस्तानी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. पाकिस्तान सातत्याने पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवरुन अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न करीत आहे. ‘टेरर फंडिंग’साठी ही अमली पदार्थांची तस्करी केली जात असून दहशतवाद्यांपर्यंत फंडिंगचे स्रोत कापून काढण्यासाठी सुरक्षादल व यंत्रणा काम करीत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अमली पदार्थ तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला - तीन पाकिस्तानी घुसखोर ठार - १८० कोटींचे अंमली पदार्थ जप्तशनिवारी रात्री अडीचच्या सुमारास सांबा सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ टेहळणी उपकरणांमध्ये काही हालचाली नोंदविण्यात आल्या. यानंतर ताबडतोब यांची सूचना सीमेवर त्या भागात तैनात बीएसएफ जवानांपर्यंत पोहोचविण्यात आली व त्यांना ऍलर्ट करण्यात आले. सीमेच्या कुंपणामधून घुसण्याचा प्रयत्न करीत असताना सुरक्षादलांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये तीन घुसखोर ठार झाले, अशी माहिती बीएसएफचे जम्मू-काश्मीरमधील महानिरिक्षक डी. के. बोरा यांनी दिली.

येथील दाट अंधार आणि धुक्याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणवर अमली पदार्थ तस्करीचा हा प्रयत्न होता. तो उधळून लावण्यात आला, असे बोरा यांनी सांगितले. या भागात ज्यावेळी शोध घेण्यात आला त्यावेळी प्रत्येकी एक किलोची ३६ पाकिटे सापडली. यामध्ये ३६ किलो हेरॉईन होते. तसेच पिस्तूल मॅगझीन, काडतूसेही ठार झालेल्या तस्करांजवळ सापडली आहे. याशिवाय पाकिस्तानी रुपये, पाकिस्तानात बनलेले कफसिरफही तस्करांकडे सापडले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १८० कोटी रुपये इतकी आहे. तसेच गेल्या महिनाभरात बीएसएफच्या जवानांनी अमली पदार्थ तस्करीचा उधळलेला चौथा प्रयत्न असल्याचे बीएसएफच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

गेल्या एका वर्षात सीमेपलिकडून होत असलेली कोणतेही हालचाल दुर्लक्षित राहिलेली नाही. घुसखोरांचे प्रत्येक प्रयत्न सीमेवर तैनात बीएसएफच्या जवानांनी उधळला आहे, असे महानिरिक्षक बोरा यांनी अधोरेखित केले. तसेच गेल्या दहा दिवसांपासून सीमेवर अमली पदार्थ तस्करीचा मोठा प्रयत्न होऊ शकतो, अशा माहिती मिळत होती. त्यामळे बीएसएफच्या जवानांना आधीपासून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता, असे बोरा म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सीमेवर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी बीएसएफ तयार असून सीमेवर गस्त अधिकच कडक करण्यात आली आहे. तसेच ठार झालेले तस्कर दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत का? याचा तपास केला जात असल्याची माहिती बीएसएफच्या महानिरिक्षकांनी दिली. जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अमली पदार्थ तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला - तीन पाकिस्तानी घुसखोर ठार - १८० कोटींचे अंमली पदार्थ जप्ततसेच ऑपरेशन अजून सुरू असून त्यानंतर यासंदर्भात काही निष्कर्षांपर्यंत पोहोचू असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शनिवारीच जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लात ‘नार्को टेरर मॉड्यूल’ उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली होती व ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तरुणांना अमली पदार्थांच्या नशेच्या व्यसनात ढकलून भारताच्या प्रगतीवर आघात करण्याचा पाकिस्तानचा जुना डाव आहे. यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर अमली पदार्थांतून मिळणारा पैसा हा पाकिस्तान पुरस्कृत दहशवाद्यांच्या फंडिंगचे मुख्य स्रोत आहे.

जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरातमधील पाकिस्तानला लागून असलेल्या भूसीमेवर वाढविण्यात आलेली गस्त व घुसखोरी रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांमुळे पाकिस्तान या तस्करीसाठी आता ड्रोनचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच समुद्री मार्गानेही अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न वाढले आहेत. गेल्या दोन वर्षात नौदल व तटरक्षकदलांनी असे कितीतरी प्रयत्न उधळले असून हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

leave a reply