पॅसिफिकमधील चीनच्या धोक्याविरोधात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडची एकजूट

australia-new-zealandकॅनबेरा – पॅसिफिक बेटदेशांमध्ये आपला लष्करी प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनविरोधात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी एकजूट जाहीर केली. त्याचबरोबर क्षेत्रीय सुरक्षेच्या आघाडीवर उभय देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी जाहीर केला. दरम्यान, चीनच्या विस्तारवादी धोरणांविरोधात शेजारी लोकशाही देशांचेही सहाय्य घेणार असल्याचे या दोन्ही देशांनी म्हटले आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा दौरा करुन नवनियुक्त पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. पॅसिफिक बेटदेशांमधील चीनच्या हालचाली आणि हवामानबदल या दोन प्रमुख मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. चीन पॅसिफिक बेटदेशांशी सुरक्षाविषयक करार करून येथे आपले लष्करी तळ उभारण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केला.

jinpingचीनच्या या विस्तारवादी कारवाया रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये एकवाक्यता असल्याचे पंतप्रधान अल्बानीज म्हणाले. यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड कोणती पावले उचलणार, यचे तपशील उघड करण्याचे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी टाळले. पण क्षेत्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सहकार्य वाढविण्यासाठी उभय देश लवकरच प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान अल्बानीज यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी पॅसिफिक बेटदेशांचा मोठा दौरा केला होता. सॉलोमन आयलँड्स प्रमाणे इतर बेटदेशांबरोबरही सुरक्षा करार करण्याची तयारी चीनने केली होती. पण सॉलोमन आयलँड्सच्या अनुभवातून सावध झालेल्या पॅसिफिक बेटदेशांनी चीनचा प्रस्ताव धुडकावला होता. पॅसिफिक बेटदेशांमध्ये आपला प्रभाव वाढविण्याच्या तयारीत असलेल्या चीनसाठी हा मोठा धक्का होता.

याच सुमारास चीनच्या लढाऊ विमानाने साऊथ चायना सी क्षेत्रातून गस्त घालणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विमानाजवळून धोकादायकरित्या उड्डाण केले होते. चीनच्या या चिथावणीखोर कारवाईवर ऑस्ट्रेलियाने सडकून टीका केली होती.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे नेते चीनविरोधात आपले ऐक्य प्रदर्शित करीत असताना, अमेरिका व चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply