पाश्चिमात्य देश रशियन इंधन नाकारु शकणार नाहीत

-राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

Western-countriesमॉस्को – पाश्चिमात्य देशांनी कितीही निर्बंध लादले व पर्याय तयार केले तरी पुढील अनेक वर्षे हे देश रशियन इंधन नाकारु शकणार नाहीत, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे जगातील इंधनपुरवठ्यात घट झाली असून दरांचा भडका उडत आहे व कंपन्यांना होणारा नफाही वाढत आहे, याकडेही पुतिन यांनी यावेळी लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वीच युरोपिय महासंघाने या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात 90 टक्क्यांनी कमी करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

जागतिक इंधनक्षेत्रातील रशियाचा हिस्सा जवळपास 10 टक्के आहे. कच्चे तेल व नैसर्गिक इंधनवायूव्यतिरिक्त रशिया हा कोळशाचाही आघाडीचा निर्यातदार देश आहे. युरोप खंडाच्या एकूण इंधनाच्या मागणीपैकी 30 टक्क्यांहून अधिक गरज एकट्या रशियाकडून पूर्ण केली जाते. त्याचवेळी चीन, भारत व जपानसारख्या आघाडीच्या देशांनाही रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनपुरवठा करण्यात येतो.

Western-countries-1युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्राची कोंडी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र त्यामुळे रशियाचे मोठे नुकसान होण्याऐवजी अमेरिका व युरोपिय देशांनाच मोठे धक्के बसले आहेत. या देशांमध्ये इंधनाच्या दरांसह महागाई विक्रमी स्तरावर भडकली असून त्याचा सर्वाधिक त्रास सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. मात्र या देशांमधील सत्ताधारी याचे खापर रशियावर फोडून मोकळे झाले आहेत.

रशियावर निर्बंध लादताना रशियन अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. पण रशियन अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नसून इंधन उत्पादनही सुरळीत होत असल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली. तर इंधनातून रशियाला मिळणारे उत्पन्न वाढल्याचेही उघड झाले. अमेरिकेच्या संसदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कबुली दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

leave a reply