चीनच्या शांघाय शहरात ‘वीकेंड लॉकडाऊन’ची घोषणा

- राजधानी बीजिंगमध्येही नवे रुग्ण आढळल्याने निर्बंध

‘वीकेंड लॉकडाऊन'बीजिंग/शांघाय – गेल्याच आठवड्यात कोरोना लॉकडाऊनच्या निर्बंधांमधून सुटका झालेल्या शांघाय शहरात पुन्हा नव्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. शांघाय शहरातील आठ प्रमुख भागांमधील दीड कोटींहून अधिक नागरिकांना नव्या निर्बंधांचा फटका बसणार आहे. सध्या फक्त आठवड्याचे दोन दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असली तरी यापूर्वीचा अनुभव पाहता त्याची मर्यादा लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. शांघायबरोबरच राजधानी बीजिंगमध्येही नव्या निर्बंधांची घोषणा करण्यात आल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही महिन्यात चीनच्या विविध प्रांतांसह आघाडीच्या शहरांमध्ये कोरोनाचे वारंवार उद्रेक होत असल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या शांघायमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. हा नवा उद्रेक अजूनही पूर्ण थांबलेला नसून आर्थिक व व्यापारी केंद्र असणाऱ्या शांघायसह राजधानी बीजिंगमध्येही रुग्ण आढळत आहेत. मार्च महिन्यात सुरू झालेला उद्रेक थांबविण्यासाठी सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी’अंतर्गत लॉकडाऊनची घोषणा केली होती.

‘वीकेंड लॉकडाऊन'मार्च महिन्याच्या अखेरीस लागू झालेला हा लॉकडाऊन तब्बल दोन महिने ठेवण्यात आला होता. नागरिकांमधील असंतोष टोकाला पोहोचून त्याचे पडसाद उमटू लागल्याने जून महिन्याच्या 1 तारखेपासून निर्बंध मागे घेण्यात आले होते. या निर्णयामुळे शांघायमधील अडीच कोटी नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र त्याला 10 दिवस उलटत नाहीत तोच शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शांघायमधील पुडाँगसह आठ डिस्ट्रिक्टमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. याचा फटका दीड कोटींहून अधिक नागरिकांना बसू शकतो, अशी माहिती माध्यमांनी दिली.

चिनी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार शांघायमधील हा नवा लॉकडाऊन सध्या ‘वीकेंड’ अर्थात आठवड्याच्या दोन दिवसांपुरताच असणार आहे. या काळात शांघायच्या 60 टक्क्यांहून अधिक भागात ‘मास टेस्टिंग’ घेण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नव्या घोषणेमुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले असून सोशल मीडियावरून तीव्र नाराजीच्या तसेच चिंतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वी मार्च महिन्याच्या अखेरीस एका आठवड्याकरता जाहीर झालेला लॉकडाऊनअनिश्चित कालावधीसाठी वाढविण्याचा निर्णय घेतला गेला होता.

दरम्यान, शांघायमधील लॉकडाऊनबरोबरच राजधानी बीजिंगमध्ये नवे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे समोर आले. बीजिंगच्या चाओयांग डिस्ट्रिक्ट भागात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागासह त्याला जोडून असलेल्या क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणांसह फिटनेट व ट्रेनिंगची केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भागात मास टेस्टिंगही सुरू करण्यात आले असून शुक्रवारी 21 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली होती.

leave a reply