भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

मुक्त व्यापारनवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दहा वर्षाच्या चर्चेनंतर मुक्त व्यापार करार झाला आहे. व्हर्च्युअल बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत ‘भारत-ऑस्ट्रेलियामध्ये इकॉनॉमिक कोऑपरेशन ऍण्ड ट्रेड ऍग्रीमेंट’ (इंडस एक्टा) करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हा करार दोन्ही देशांना संधीची नवी द्वारे उघड करणारा ‘ऐतिहासिक’ करार आहे. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांसाठी हा निर्णायक क्षण असल्याची बाब यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली.

गेल्या माहिन्यात भारत आणि युएईमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षर्‍या झाल्या होत्या. त्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्येही मुक्त व्यापार करार झाला आहे. यामुळे भारताचा व्यापार अधिकच वाढणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील व्यापार पुढील पाच वर्षात ५० अब्ज डॉलर्सवर पोहोचेल असा दावा केला जात आहे. तसेच यामुळे १० लाख जणांना रोजगर उपलब्ध होतील, असे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. शनिवारी पार पडलेला करार हा मुख्य करारापूर्वी झालेला अंतरिम करार आहे. तर संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह करार हा यावर्षाखेरीपर्यंत होईल, असे दावे केले जात आहेत.‘इंडस एक्टा’ या अंतरिम करारामुळे सहा हजार क्षेत्र भारतीय व्यापार्‍यांसाठी ऑस्ट्रेलियात निर्यातीसाठी खुली झाली आहेत. यामध्ये वस्त्र, लेदर, फर्निचर, ज्चेलरी आणि मशिनरीसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रांना ऑस्ट्रेलियन बाजारात करमुक्त प्रवेश मिळणार आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाला भारतीय बाजारात ११५०० वस्तूंसाठी करमुक्त प्रवेश मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया भारतात प्रामुख्याने कच्चा माल निर्यात करतो. यामध्ये कोळसा, पोलाद, ऍल्युमिनियम व इतर खनिजांचा समावेश आहे. गेली दहा वर्ष भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू होती. अखेर त्याला मूर्त रुप मिळाले आहे.

विशेषत: सध्याच्या जागतिक परिस्थितीत गेल्या दीड वर्षात हा करार करण्यासाठी वेग देण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधात तणाव आहे. चीनने ऑस्ट्रेलियामधून कोळसा आयात थांबविलेली आहे. तसेच कोरोनामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसले असून विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीत दोन्ही देशांचा व्यापार वाढल्यास तो एकमेकांना पुरक ठरेल, हे स्पष्ट झाल्यावर लवकरात लवकर हा करार व्हावा, यासाठी पावले उचलण्यात आली. गेल्यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने आपले विशेष व्यापारी दूत म्हणून चर्चा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया माजी पंतप्रधान टोनी ऍबट यांना भारतात पाठविले होते. यावेळी ऍबट यांनी चीनपेक्षाही अधिक विश्‍वासार्ह व्यापारी भागीदार देश असल्याचा दावा केला होता. यातून भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कराराचे महत्व अधोरेखित होते.

भारताची बाजारपेठ पाहता अनेक देश भारताशी करार करण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच भविष्यात कोणा एका देशावर पुरवठा साखळी अवलंबून राहणे धोकादायक ठरेल, हे कोरोनाच्या संकटाने दाखवून दिले आहेत. त्यामुळे सर्वच बडे देश आपले नवे व्यापारी भागिदार शोधत असून भारतीय बाजारपेठ या देशांना खुणावत आहे. सध्या भारताची ब्रिटनबरोबरील दुसर्‍या टप्प्यातील मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चा पुर्ण झाली आहे. युरोपियन युनियनबरोबरील चर्चा प्रगतीपथावर आहे. तसेच युएईनंतर इतर आखाती देशही भारताशी मुक्त व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत.

शनिवारी भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान ‘इंडस एक्टा’ हा करार पार पडल्यावर पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांचे आभार मानले. तसेच हा करार लवकरात लवकर मार्गी लावा, असे आदेश आपण दिले होते, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनीही अलीकडच्या वर्षात दोन्ही देशांमधील उल्लेखनीय सहकार्याची दखलात देत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल आभार मानले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बळकट होत असलेल्या संबंधातील आणखी एक महत्वपूर्ण टप्पा, असा उल्लेख यावेळी मॉरिसन यांनी केला.

दोन वेगाने विस्तारणार्‍या क्षेत्रीय अर्थव्यवस्था आणि समविचारी लोकशाही देश हा एकत्र काम करीत असल्याने आणखी मोठी संधीची द्वारे खुली झाली आहे. यामुळे पुरवठा साखळीची सुरक्षा आणि लवचिकता सुनिश्चित होईल, असा सुस्पष्ट संदेश हा करार देतो, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले.

leave a reply