पाकिस्तानात पंतप्रधान व लष्कर एकमेकांच्या विरोधात

पंतप्रधान व लष्करइस्लामाबाद – अमेरिकेने नेहमीच पाकिस्तानचा विश्‍वासघात केला. अफगाणिस्तानातील युद्धात अमेरिकेला सहकार्य करण्यास नकार दिल्यानेच, आपले सरकार पाडण्यासाठी कारस्थान रचले जात असल्याचा लक्षवेधी आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता. यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रयत्न करीत असल्याचा अप्रत्यक्ष ठपका इम्रान यांनी ठेवला होता. यानंतर पाकिस्तानात वाद पेटलेला असताना, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी आपल्या देशाचे अमेरिकेबरोबर दीर्घकालिन आणि उत्कृष्ट धोरणात्मक संबंध असल्याचे जाहीर केले. तसेच रशियाने युक्रेनमध्ये हल्ले चढविण्याची चूक केल्याचे सांगून पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान इम्रान यांच्या भूमिकेला छेद दिला. त्यामुळे पाकिस्तानात इम्रान सरकार विरोधात लष्कर असा उघड संघर्ष उभा राहिल्याचे दिसत आहे.

येत्या काही तासात, रविवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्‍वासदर्शक ठरावावर अंतिम मतदान होणार आहे. गेली तीन वर्षे इम्रान खान यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री, नेते व राजकीय पक्ष गेल्या आठवड्याभरात विरोधी गटात जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे इम्रान खान यांच्याविरोधात अविश्‍वासदर्शक ठराव पारित होईल, असे दावे पाकिस्तानातील प्रत्येक माध्यमे व पत्रकार करीत आहेत. पण इम्रान खान आपण राजीनामा देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत व गेल्या पाच दिवसांपासून पाकिस्तानी माध्यमेे तसेच सभांच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना संबोधित करीत आहेत.

आपल्याला सत्तेवरुन दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट आखला गेल्याची बोंब सुरू केली आहे. या कटात पाकिस्तानी लष्कर सहभागी असल्याचा आरोपही इम्रान खान करू लागले आहेत. काही तासांपूर्वी पाकिस्तानच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानच्या लष्कराने आपल्यासमोर तीन पर्याय ठेवल्याचे सांगितले.पंतप्रधानपदाचा राजीनामा, अविश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाणे किंवा नवी निवडणूक असे ते तीन पर्याय असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेवर आरोप करून आपली राजकीय कारकिर्द नाही तर पाकिस्तानचे भविष्य टांगणीला लावल्याची टीका होत आहे. अशा परिस्थितीत, शुक्रवारी पाकिस्तानमध्ये आयोजित इस्लामाबाद सिक्युरिटी डायलॉगमध्ये बोलताना लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी अमेरिकेबरोबरील संबंधांची तारीफ केली. अमेरिकेबरोबर दीर्घकालिन संबंध कायम असून यापुढेही ते असेच सुरू राहतील, असे बाजवा यांनी स्पष्ट केले. यामुळे इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्कर उघडपणे एकमेकांविरोधात गेल्याचे दिसत आहे.

leave a reply