‘इंडो-पॅसिफिक आर्थिक करारा’त तैवानचा समावेश करा

- अमेरिकेच्या संसद सदस्यांची मागणी

‘इंडो-पॅसिफिक आर्थिक करारा’तवॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार करण्यात येणार्‍या ‘इंडो-पॅसिफिक आर्थिक करारा’त तैवानचाही समावेश करावा, अशी मागणी अमेरिकेच्या संसद सदस्यांनी केली. अमेरिकेच्या सुमारे २०० संसद सदस्यांनी यासंदर्भात पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन’सह इतर जागतिक यंत्रणांमध्ये तैवानला सहभागी करून घेण्यासंदर्भातही हालचाली सुरू झाल्या आहेत. तैवानच्या अमेरिकेतील राजदूत व अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये या मुद्यावर नुकतीच चर्चा झाल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली.

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य असणार्‍या स्टिव्ह चॅबोट, अल्बिओ सिरेस, मारिओ डिआझ-बलार्ट व गेरी कॉनोली यांनी पुढाकार घेऊन पत्र लिहिले आहे. या पत्रावर त्यांच्यासह दोन्ही पक्षांच्या २०० सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जिना रायमोंडो व व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे. ‘रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आक्रमक चीनविरोधात खड्या ठाकलेल्या तैवानला निःसंदिग्धपणे पाठिंबा देणे अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहे. अमेरिका चीनच्या दबावापुढे माघार घेणार नाही हा स्पष्ट संदेश तैवानच्या समावेशातून मिळेल’, असे अमेरिकी संसद सदस्यांनी म्हटले आहे.

‘इंडो-पॅसिफिक आर्थिक करारा’तइंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’मधील तैवानच्या समावेशाचे समर्थन करताना त्या देशाबरोबर अमेरिकेचे असलेले व्यापारी संबंध व आशियातील स्थान यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिका-तैवान द्विपक्षीय व्यापार ११४ अब्ज डॉलर्सचा असून हा देश अमेरिकेचा आठवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे, याकडे संसद सदस्यांनी लक्ष वेधले. ‘आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन’मधील (ऍपेक) तैवानची सदस्यता व ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’मधील समावेशासाठी तैवानने दाखविलेली उत्सुकता हे मुद्दे देखील महत्त्वाचे ठरतात, असा दावा पत्रात करण्यात आला आहे.

‘इंडो-पॅसिफिक आर्थिक करारा’तअमेरिका व तैवानमध्ये सध्या आर्थिक सहाकार्याच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’मधील अनेक मुद्यांचा समावेश असल्याची जाणीवही अमेरिकी संसद सदस्यांनी करून दिली. जागतिक पुरवठा साखळी, ५जी तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रात तैवानची भूमिका महत्त्वाची ठरते, याकडे अमेरिकी संसद सदस्यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’बरोबरच जागतिक पातळीवरील इतर आघाडीच्या यंत्रणांमध्ये तैवानचा समावेश करण्याबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत. तैवानच्या अमेरिकेतील राजदूत सिआो बि-खिम यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी मिशेल जे. सिसन यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत तैवानला ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ तसेच ‘इंटरनॅशनल सिव्हिल ऍव्हिएशन ऑर्गनायझेशन’ यासारख्या जागतिक संघटनांमध्ये सदस्यत्व देण्याबाबत चर्चा झाली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली आहे.

leave a reply