चीनपासून वाढलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया-जपान संरक्षण सहकार्य वाढविणार

संरक्षण सहकार्यटोकिओ/सिडनी – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांमध्ये आपला लष्करी आणि आर्थिक प्रभाव वाढविणाऱ्या चीनविरोधात ऑस्ट्रेलिया व जपानने हालचाली वाढविल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी जपानचा दौरा करून संरक्षण सहकार्य व्यापक करण्यावर चर्चा केली. तसेच ऑस्ट्रेलियाने अधिक आक्रमक भूमिका स्वीकारून ‘साऊथ चायना सी’मधील आपली गस्त सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पॅसिफिक देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत.

महिन्यापूर्वी चीनने सॉलोमन आयलँड्स या बेटदेशाबरोबर संरक्षण सहकार्य केला होता. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रभावक्षेत्रात असलेल्या सॉलोमनमध्ये चीन आपले लष्करी तळ प्रस्थापित करू शकतो, असा आरोप ऑस्ट्रेलियाने केला होता. चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. पण पुढच्या काही दिवसातच चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वनातू, किरिबाती, मार्शल आयलँड्स अशा दहा बेट देशांबरोबर तसेच सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यासाठी सदर बेटदेशांच्या विशेष दौऱ्यावर गेले होते.

पण सॉलोमन आयलँड्सच्या उदाहरणामुळे सावध झालेल्या पॅसिफिक बेटदेशांनी चीनबरोबरील सहकार्याच्या प्रस्तावातून माघार घेतली होती. त्यामुळे परराष्ट्रमंत्री वँग ई यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपला आर्थिक आणि लष्करी प्रभाव वाढविण्याच्या तयारीत असलेल्या चीनकडून नव्याने असे प्रयत्न होऊ शकतात, याची जाणीव ऑस्ट्रेलियाला झाली आहे. या पार्श्वभूमीवर सदर क्षेत्रातील आपल्या सहकारी देशांसह ऑस्ट्रेलियाने सहकार्य वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

ऑस्ट्रेलियाचे नवनियुक्त संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी बुधवारी जपानचा दौरा करुन संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांची भेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मार्लेस यांचा हा पहिला परदेश दौरा ठरतो. यावेळी ईस्ट आणि साऊथ चायना सीमधील यथास्थिती बदलण्याच्या कुठल्याही प्रयत्नांना ऑस्ट्रेलिया व जपान विरोध करतील, असे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्याची मोठी जबाबदारी जपान व ऑस्ट्रेलियावर असल्याचे संरक्षणमंत्री किशी यांनी स्पष्ट केले. उघड उल्लेख करण्याचे टाळले तरी दोन्ही देशांनी चीनविरोधात आघाडी भक्कम करण्याचे संकेत दिले आहेत.

‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाने आणखी एक पाऊल उचलले आहे. चीनच्या धमक्यांची अजिबात पर्वा न करता, या सागरी क्षेत्रातील ऑस्ट्रेलियन युद्धनौकांची गस्त कायम राहिल, असे संरक्षणमंत्री मार्लेस यांनी जाहीर केले. काही दिवसांपूर्वी ‘साऊथ चायना सी’च्या हवाईहद्दीतून प्रवास करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टेहळणी विमानावर चीनच्या लढाऊ विमानाने फ्लेअर्सचा मारा केला होता. यानंतर चीनने ऑस्ट्रेलियाला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाने चीनच्या धमकीची पर्वा न करता सदर सागरी क्षेत्रातील गस्त सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे, ही लक्षणीय बाब ठरते.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग पॅसिफिक बेटदेशांच्या दौऱ्यावर आहेत. न्यूझीलँड आणि सॉलोमन आयलँड्स यापासून ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. लवकरच ऑस्ट्रेलिया पॅसिफिक बेटदेशांची बैठक आयोजित करणार आहे.

leave a reply