इस्रायल इजिप्तमार्गे युरोपिय महासंघाला गॅसचा पुरवठा करणार

गॅसचा पुरवठाकैरो – इस्रायल, इजिप्त आणि युरोपिय महासंघामध्ये इंधनविषयक सामंजस्य करार संपन्न झाला. यानुसार इस्रायल इजिप्तच्या सहकार्याने युरोपिय महासंघाला नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे हा करार ऐतिहासिक बनला असून यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा क्षेत्रात आपल्या देशाचे स्थान निर्माण होत असल्याचे इस्रायलच्या ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. यामुळे युरोपिय महासंघाचे रशियन इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, असा दावा केला जातो.

युरोपिय देश रशियाच्या इंधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. गेल्या वर्षी रशियाच्या इंधनवायू निर्यातीपैकी 40 टक्के इतकी निर्यात युरोपिय देशांना करण्यातआली होती. पण गेल्या तीन महिन्यांपासून युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यानंतर युरोपिय महासंघाने रशियावर कठोर निर्बंध लादले. त्याचा थेट परिणाम युरोपिय देशांच्या रशियाबरोबरील इंधनविषयक सहकार्यावर झाला आहे.

गॅसचा पुरवठात्यातच ‘आमचे उत्पादन, आमचे नियम’, असे सांगून रशियन इंधननिर्मिती कंपनी गाझप्रोमने जर्मनीच्या दैनंदिन इंधनवायूच्या पुरवठ्यात कपात केली आहे. येत्या काळात रशिया इतर युरोपिय देशांबाबतही असे निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते. या काळात आखाती देशांनीही रशियावरील निर्बंधांना विरोध केला व युरोपिय देशांसाठी इंधनाचे उत्पादन वाढविण्याची अमेरिकेची मागणी फेटाळली.

त्यामुळे अडचणीत सापडलेल्या युरोपिय महासंघाने इस्रायलकडून इंधनवायूच्या खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, युरोपिय कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन दर लेन यांनी इजिप्तची राजधानी कैरोचा दौरा करून इस्रायलच्या ऊर्जामंत्री कॅरीन एलहरार यांची भेट घेतली. यावेळी इस्रायल, इजिप्त आणि युरोपिय महासंघात इंधनवायूच्या निर्यातीबाबत सामंजस्य करार झाला.

गॅसचा पुरवठायानुसार, भूमध्य समुद्रातील इस्रायलच्या प्रकल्पातून निघणाऱ्या इंधनावर इजिप्तमध्ये प्रक्रिया करून ते पुढे सागरीमार्गाने युरोप पाठविले जाईल. यामुळे इस्रायलच्या तिजोरीत वर्षाकाठी 29 कोटी डॉलर्स जमा होतील, असे इस्रायली वृत्तवाहिन्यांचे म्हणणे आहे. इस्रायलच्या ऊर्जा क्षेत्रासाठी ही मोठी घडामोडठरते, असे एलहरार यांनी म्हटले आहे. याआधी इस्रायली कंपनीने तुर्कीच्या सहाय्याने इराकमधील इंधन पाईपलाईनच्या सहाय्याने सिरियामार्गे युरोपपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले होते.

इस्रायल, इजिप्त आणि युरोपिय देशांमधील हे इंधनविषयक सहकार्य केवळ इंधनव्यवहारापुरते मर्यादित राहणारे नाही. रशियाच्या हितसंबंधांना याचा फार मोठा फटक बसू शकतो. त्यामुळे या सहकार्याचे फार मोठे आर्थिक व सामरिक परिणाम पुढच्या काळात समोर येऊ शकतात.

leave a reply