‘फेडरल रिझर्व्ह’च्या ऐतिहासिक दरवाढीनंतर शेअरबाजार कोसळले

‘फेडरल रिझर्व्ह'वॉशिंग्टन – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात ऐतिहासिक पाऊण टक्क्यांची वाढ करीत असल्याची घोषणा केली. 1994 सालानंतर फेडरल रिझर्व्हने केलेली व्याजदरातील ही सर्वात मोठी वाढ ठरते. अमेरिकेपाठोपाठ ‘बँक ऑफ इंग्लंड’ तसेच ‘स्विस नॅशनल बँके’ने देखील व्याजदरात वाढ जाहीर केली. याचे शेअरबाजारात तीव्र पडसाद उमटले. अमेरिका व युरोपसह आशियाई शेअरबाजार कोसळले असून पुढील काही दिवस ही घसरण सुरू राहिल, अशी भीती विश्लेषकांनी वर्तविली आहे.

‘अमेरिकेत भडकलेली महागाई कमी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही त्याच दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे’, अशा शब्दात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी बुधवारी ऐतिहासिक दरवाढ जाहीर केली. पॉवेल यांनी घोषित केलेली 0.75 टक्क्यांची दरवाढ गेल्या 28 वर्षातील अमेरिकेतील सर्वात मोठी व्याजदरवाढ आहे. गेल्या चार महिन्यांमधील ही तिसरी दरवाढ ठरते. यापूर्वी मार्च महिन्यात व्याजदर 0.25 टक्क्यांनी तर मे महिन्यात अर्ध्या टक्क्यांनी वाढविण्यात आले होते.

या ऐतिहासिक दरवाढीनंतर अमेरिकेतील व्याजदर 1.5 ते 1.75 टक्क्यांच्या टप्प्यात पोहोचले आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेतील व्याजदर 3.5 टक्क्यांपर्यंत नेण्याचे संकेत फेडरल रिझर्व्ह तसेच अर्थतज्ज्ञांकडून देण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील महागाई निर्देशांक 8.6 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले होते. चार दशकांमधील या विक्रमी भडक्यामुळे फेडरल रिझर्व्हसमोर मोठ्या दरवाढीव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता, असा दावा सूत्रांनी केला.

‘फेडरल रिझर्व्ह'अमेरिकेपाठोपाठ जगातील इतर प्रमुख मध्यवर्ती बँकांकडूनही व्याजदरवाढीची घोषणा झाली आहे. युरोपातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या स्वित्झर्लंड व ब्रिटनने व्याजदरात वाढीची घोषणा केली. ‘स्विस नॅशनल बँके’ने तब्बल 15 वर्षानंतर प्रथमच दरवाढीचा निर्णय घेतला. ही दरवाढ अर्ध्या टक्क्यांची असेल, असे बँकेकडून जाहीर करण्यात आले. तर ‘बँक ऑफ इंग्लंड’कडून यापूर्वी सलग चार महिने व्याजदरात वाढ करण्यात आली होती. गुरुवारी 0.25 टक्क्यांची वाढ या वर्षातील सलग पाचवी दरवाढ ठरली आहे. या दरवाढीनंतर ब्रिटनमधील व्याजदर 1.25 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

अमेरिका, ब्रिटन व स्वित्झर्लंडने केलेल्या व्याजदरातील वाढीची प्रतिक्रिया शेअरबाजारात उमटली आहे. अमेरिकेतील डो जोन्स निर्देशांक गुरुवारी तब्बल 460 अंशांनी कोसळला. ‘एसॲण्डपी 500 फ्युचर्स’ 1.7 टक्क्यांनी तर ‘नॅस्डॅक 100′ दोन टक्क्यांनी घसरला आहे. युरोपातील आघाडीचा शेअरनिर्देशांक ‘स्टॉक्स युरोप 600 इंडेक्स’ 2.3 टक्क्यांनी तर ‘एफटीएसई 100′ 2.4 टक्क्यांनी खाली आला. फ्रान्सच्या ‘सीएसी इंडेक्स’मध्ये जानेवारीतील उच्चांकाच्या तुलनेत 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशियातही जपान, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, चीन व भारतातील शेअरबाजार कोसळले आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील ऐतिहासिक व्याजदरवाढीनंतरही पुढील काही महिने अर्थव्यवस्था मंदावलेली राहिल, असे भाकित विश्लेषकांनी वर्तविले आहे.

leave a reply