ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या ‘युनायटेड फ्रंट’वर चीनचे टीकास्त्र

वेलिंग्टन/बीजिंग – ‘साऊथ चायना सी’सह हाँगकाँग व उघुरवंशियांच्या मुद्यावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने दाखविलेल्या ‘युनायटेड फ्रंट’मुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. सोमवारी दोन देशांनी दिलेल्या संयुक्त निवेदनावर चीनकडून आक्रमक प्रतिक्रिया आली असून, तथ्यहीन आरोप व बेजबाबदार वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे चीनने बजावले आहे.

‘युनायटेड फ्रंट’ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या नेत्यांनी हाँगकाँग, झिंजिआंग व साउथ चायना सीसारख्या चीनच्या अंतर्गत बाबींसंदर्भात बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांनी चीनवर केलेले तथ्यहीन आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याबरोबरच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने आंतरराष्ट्रीय कायदे तसेच नियमांचाही भंग केला आहे’, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी या दोन्ही देशांना फटकारले.

संबंधित देश मानवाधिकारांच्या नावाखाली अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचे समर्थन करु शकत नाहीत, असा दावा वेन्बिन यांनी केला. साऊथ चायना सीच्या मुद्यावर चीन आपले सार्वभौमत्त्व व हितसंबंधांशी कधीही तडजोड करणार नाही, असा इशाराही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिला. चिनी प्रवक्त्यांच्या या वक्तव्यावर न्यूझीलंडकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने उपस्थित केलेल्या मुद्यांवर चीन त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनेच व्यक्त झाला आहे, असा टोला न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्री नानिआ माहुता यांनी लगावला.

‘युनायटेड फ्रंट’त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोमवारी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांच्याशी चीनसह इतर द्विपक्षीय मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन संयुक्त निवेदन जारी केले. त्यात साऊथ चायना सीमधील घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त करताना या क्षेत्रातील वाढत्या लष्करी तैनातीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हाँगकाँग व झिंजिआंगमध्ये उघुरवंशियांवर होणारे अत्याचार हा मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा असल्याची टीकाही निवेदनात करण्यात आली. मुख्य म्हणजे कोरोना साथीच्या उगमाबाबत सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे संयुक्त निवेदन जारी करण्यापूर्वी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये चीनच्या मुद्यावरून मतभेद असल्याचे वृत्त स्पष्ट शब्दात फेटाळून लावले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनीही त्याला दुजोरा दिला. ‘इथून दूरवर असलेले काही जण आमच्यात फूट पाडायचे प्रयत्न करीत आहेत, पण ते यशस्वी होणार नाहीत’, अशा शब्दात पंतप्रधान मॉरिसन यांनी चीनला फटकारले.

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही देशांसाठी चीन हा प्रमुख व्यापारी भागीदार देश आहे. त्याचा फायदा उचलून चीन या देशांमध्ये आपला प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत. ऑस्ट्रेलियाने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी न्यूझीलंडचे धोरण काही प्रमाणात लवचिक असल्याचे समोर आले होते. चीनने ऑस्ट्रेलियावर टाकलेल्या व्यापारी निर्बंधांचा लाभ न्यूझीलंडने घेतला होता. यामुळे न्यूझीलंडची चीनला केली जाणारी निर्यात वाढली होती. याचा प्रभाव न्यूझीलंडच्या चीनविषयक धोरणावर पडल्याचे संकेत मिळू लागले होते. आपला चीनच्या विरोधात भूमिका स्वीकारण्याला विरोध असेल, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी स्पष्ट केले होते. पण त्यानंतरच्या काळात न्यूझीलंडने चीनसाठी आपण ऑस्ट्रेलियाच्या विरोधात जाणार नाही, असे संकेत देऊन आपल्या मित्रदेशांना आश्‍वस्त केले आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या न्यूझीलंड दौर्‍यात न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिलेली ही ग्वाही महत्त्वाची ठरते.

leave a reply