नायजेरियामध्ये खंडणीसाठी 150 विद्यार्थ्यांचे अपहरण

- विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

अबूजा – नायजेरियाच्या नायजर प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी शाळेवर चढविलेल्या हल्ल्यात किमान 150 विद्यार्थ्यांचे अपहरण केले. यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाचा बळी गेला तर दुसरा गंभीर जखमी झाला. विद्यार्थ्यांचे पालक तसेच प्रशासनाकडून खंडणी मागण्यासाठी विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जातो. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नायजेरियातील शाळा व महाविद्यालयांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

नायजेरियामध्ये खंडणीसाठी 150 विद्यार्थ्यांचे अपहरण - विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढनायजेरियातील सर्वात मोठा आणि नद्यांनी समृद्ध असलेल्या नायजर प्रांतातील तेगिना शहरातील सालिहू टांको शाळेवर रविवारी बाईकवरुन आलेल्या बंदूकधारी हल्लेखोरांनी हल्ला चढविला. काही हल्लेखोरांनी शाळेची इमारत व आसपासच्या भागात बेछूट गोळीबार केला. यामध्ये स्थानिकाचा बळी गेला. गोळीबारामुळे पसरलेल्या घबराटीचा फायदा घेत हल्लेखोरांनी शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये भरून नेले.

हल्ला झाला त्यावेळी शाळेत किमान 300 विद्यार्थी होते. पण शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे अपहरण झाले नाही. हल्लेखोरांनी धष्टपुष्ट आणि वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांचेच अपहरण केल्याची माहिती स्थानिक संकेतस्थळाने दिली. अपहृत विद्यार्थ्यांची संख्या दोनशेपर्यंत असू शकते, असाही दावा केला जातो. अपहरणकर्त्यांनी काही तासांनी शरीराने कमजोर असलेल्या 11 मुलांना सोडून दिल्याचेही सांगितले जाते. हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांना कुठे नेले, याचा थांगपत्ता लागू शकलेला नाही.नायजेरियामध्ये खंडणीसाठी 150 विद्यार्थ्यांचे अपहरण - विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

खंडणीसाठी हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची शक्यता स्थानिक सुरक्षा यंत्रणा व्यक्त करीत आहेत. याआधीही हल्लेखोरांनी खंडणीसाठी नायजेरियाच्या वेगवेगळ्या भागात शाळा आणि महाविद्यालयांवर हल्ले केल्याच्या घटना ताज्या आहेत. एप्रिल महिन्यात कदूना प्रांतातील ग्रीनफिल्ड विद्यापीठातील 14 विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वीच अपहरणकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना मुक्त केले. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून आत्तापर्यंत नायजेरियातील वेगवेगळ्या घटनांमध्ये 800 हून अधिक विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.नायजेरियामध्ये खंडणीसाठी 150 विद्यार्थ्यांचे अपहरण - विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

विद्यार्थ्यांच्या या अपहरणामध्ये नायजेरियातील स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांबरोबरच बोको हरामसारखी दहशतवादी संघटना देखील गुंतलेली असल्याचे उघड झाले आहे. डिसेंबर महिन्यात बोको हरामने कातसिना प्रांतातील 344 विद्यार्थ्यांचे अपहरण केले होते. याआधी 2014 साली याच दहशतवादी संघटनेने चिबोक शहरातील 276 विद्यार्थीनींचे अपहरण केले होते. नायजेरियात विद्यार्थ्यांवर होत असलेल्या या हल्ल्यांवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

काही ठिकाणी हल्लेखोर, दहशतवादी ख्रिस्तधर्मियांच्या शाळा व विद्यापीठांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. आठवड्याभरापूर्वी नायजेरियाच्या प्लॅटेऊ प्रांतात ख्रिस्तधर्मिय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची निघृण हत्या झाली होती. या हल्ल्यांमागे फुलानी टोळ्या असल्याचे उघड झाले होते.

leave a reply