ऑस्ट्रेलिया फ्रान्सला ‘ऑकस डील’ची भरपाई देण्यास तयार

- ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घोषणा

कॅनबेरा/पॅरिस – ऑस्ट्रेलियाने पाणबुड्यांचे कंत्राट काढून घेतल्याने झालेले फ्रान्सचे नुकसान भरून देण्याची तयारी दर्शविली आहे. ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ही घोषणा केली. यानुसार ऑस्ट्रेलिया फ्रान्सच्या ‘नेव्हल ग्रुप’ या कंपनीला 58 कोटी डॉलर्सची भरपाई देणार आहे. फ्रान्सबरोबरील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी स्पष्ट केले. फ्रान्सनेही याचे स्वागत केले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात, अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियादरम्यान व्यापक संरक्षण सहकार्य करार करण्यात आला होता. ‘ऑकस डील’ असे नाव असलेल्या या करारानुसार, अमेरिका व ब्रिटन ऑस्ट्रेलियाला आठ आण्विक पाणबुड्या पुरविणार आहे. त्याव्यतिरिक्त दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, सायबर तंत्रज्ञान, आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्कांटम तंत्रज्ञान या क्षेत्रातील परस्पर सहकार्यावरही एकमत झाले होतेे. या करारापूर्वी फ्रान्स-ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे 90 अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. त्यानुसार फ्रान्स ऑस्ट्रेलियाला 12 पाणबुड्या उभारून देणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने ऐनवेळेस घेतलेल्या माघारीवर फ्रान्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ऑस्ट्रेलियासह अमेरिका व ब्रिटनने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची घणाघाती टीका फ्रान्सने केली होती. फ्रान्सच्या या तिन्ही देशांमधील संबंधांमध्ये यामुळे मोठा प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

मात्र ऑस्ट्रेलियात झालेल्या सत्ताबदलानंतर नव्या सरकारने फ्रान्सबरोबरील संबंध सुधारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या नव्या पंतप्रधानांनी आपण फ्रान्सचा दौरा करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

leave a reply