सौदीच्या दौऱ्यात इस्रायलच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रस्थानी असेल

- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा

वॉशिंग्टन – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आपल्या आखाती दौऱ्यावर दाखल होतील. यापैकी सौदी अरेबियाचा दौरा फक्त इंधनाशी निगडीत नसेल. तर इस्रायलच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून आपण सौदीला भेट देणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. पण सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील काही नेतेच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सौदी दौऱ्याला विरोध करीत असल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीसह आखाती देशांचा दौरा करणार असल्याची चर्चा सुरू होती. जून महिन्याच्या अखेरीस बायडेन आखातात दाखल होतील, असे दावे सूत्रांनी केले होते. पण काही कारणास्तव बायडेन यांचा हा दौरा जुलै महिन्यात ढकलण्यात आला होता. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सौदी, इस्रायल व इतर आखाती देशांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली नव्हती.

पण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन आखातासाठी रवाना होतील. यापैकी सौदी अरेबिया व इतर अरब मित्रदेशांच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पण 14 व 15 जुलै रोजी राष्ट्राध्यक्ष बायडेन इस्रायल आणि वेस्टबँकला भेट देतील, अशी माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना देखील आपल्या आखात दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट केले. ‘सौदी अरेबियातील आपली भेट फक्त इंधनाशी निगडीत नसेल. सौदीतील बैठक ही व्यापक मुद्यावर आधारीत असेल. या बैठकीत इस्रायलच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रस्थानी राहील’, असे स्वतः राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या विधानांबाबत व्हाईट हाऊसने अधिक खुलासा केलेला नाही.

दरम्यान, सौदीच्या आपल्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊ नये, अशी आग्रही मागणी डेमोक्रॅट पक्षाचे नेते करीत आहेत. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यावर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे गंभीर आरोप आहेत, याची आठवण डेमोक्रॅट पक्षाचे नेते राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना करून देत आहेत.

leave a reply