सौदी चीनच्या इंधन पुरवठ्यात कपात करणार

रियाध – सौदी अरेबिया चीनच्या इंधन पुरवठ्यात कपात करणार आहे. सौदीच्या अराम्को या इंधननिर्मिती करणाऱ्या कंपनीने ही घोषणा केली. तर भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंड या देशांच्या इंधनाच्या पुरवठ्यामध्ये कुठलाही फरक पडणार नसल्याचे अराम्कोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. या काळात चीनने रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरामध्ये इंधनाची खरेदी केली. यामुळे नाराज झालेल्या सौदीच्या अराम्को कंपनीने जुलै महिन्यापासून चीनच्या इंधनपुरवठ्यात कपात केली जाईल, असे जाहीर केले.

चिनी कंपन्यांच्या मागणीपेक्षा हा पुरवठा कमी असेल, असे ‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याचा फटका चीन आणि सौदीमधील इंधनविषयक सहकार्याला बसू शकतो, असे अमेरिकी वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

सौदीच्या इंधनकंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आशियातील इतर देशांना मिळेल, असा दावा या वृत्तसंस्थेने केला. भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंड या देशांना सौदी मागणीपेक्षा अधिक प्रमाणात इंधनाचा पुरवठा करू शकतो, असे ब्लूमबर्गने आपल्या बातमीत म्हटले आहे.

leave a reply