ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या सहाय्याने ‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’ विकसित करणार

‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’कॅनबेरा/वॉशिंग्टन – चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवाया व धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलियाने अमेरिकेबरोबरील आपले सामरिक सहकार्य अधिक बळकट करण्याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या सहकार्याने ‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’ विकसित करणार असून हा प्रकल्प म्हणजे ‘गेम चेंजिंग कॅपॅबिलिटी’ असल्याची ग्वाही ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांनी दिली. अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही याबाबत स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले आहे. हा प्रकल्प दोन देशांच्या सामरिक भागीदारीमधील महत्त्वाचा टप्पा आहे, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.

‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’काही महिन्यांपूर्वी अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या ‘टू प्लस टू’ बैठकीत दोन्ही देशांनी ‘हायपरसोनिक्स’सह ‘मिसाईल डिफेन्स’, ‘इलेक्ट्रॉनिक व अंडरसी वॉरफेअर’ आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर एकमत दर्शविले होते. त्यानंतर काही महिन्यातच दोन्ही देशांनी संयुक्तरित्या ‘हायपरसोनिक मिसाईल’च्या प्रकल्पाची घोषणा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. या प्रकल्पाला ‘सदर्न क्रॉस इंटिग्रेटेड फ्लाईट रिसर्च एक्सपरिमेंट’(सायफायर) असे नाव देण्यात आले आहे. पुढील वर्षी या प्रकल्पाशी संबंधित चाचण्या सुरू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’गेल्या काही वर्षात चीनने आपले वर्चस्व वाढविण्यासाठी आक्रमक लष्करी धोरण राबविले आहे. आशियासह ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात चीनने मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती सुरू केली आहे. या क्षेत्रात अमेरिका व मित्रदेशांच्या प्रभावाला शह देण्यासाठी विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका, पाणबुड्या, लढाऊ विमाने व प्रगत क्षेपणास्त्रांची निर्मिती तसेच तैनातीला वेग देण्यात आला आहे. साऊथ चायना सीबरोबरच हिंदी महासागर व दक्षिण पॅसिफिक क्षेत्रातही चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न चालू आहेत.

चीनच्या या कारवाया ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढविणार्‍या ठरल्या आहेत. लष्करी तैनाती व घुसखोरीबरोबरच चीनच्या सत्ताधारी राजवटीचा ऑस्ट्रेलियातील वाढता हस्तक्षेपही समोर आला होता. याविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारने ठाम भूमिका घेऊन चीनच्या दादागिरीला उघड आव्हान दिले आहे. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलिया सरकारने ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र’ तसेच संरक्षणक्षेत्राबाबत स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध करून त्यात चीन हा धोका असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्याचवेळी या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संरक्षणखर्चात वाढ करून इतर सहकारी देशांच्या सहाय्याने चीनच्या कारवाया रोखेल, अशी ग्वाहीदेखील देण्यात आली होती.

‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’अमेरिकेबरोबर ‘हायपरसोनिक क्रूझ मिसाईल’ विकसित करणे त्याचाच भाग ठरतो. येत्या पाच वर्षात हे क्षेपणास्त्र तयार करून त्याचा संरक्षणदलात समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे क्षेपणास्त्र ऑस्ट्रेलियात सध्या कार्यरत असलेल्या ‘एफ/ए-१८एफ सुपर हॉर्नेट’ या लढाऊ विमानावर तैनात करण्यात येईल, असेही सांगण्यात येते. लढाऊ विमानाव्यतिरिक्त ‘पी-८ ए पोसायडन’ या टेहळणी विमानावर तसेच ‘इए-१८जी ग्राउलर इलेक्ट्रॉनिक अटॅक एअरक्राफ्ट’वरही तैनात होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

‘ऑस्ट्रेलियाविरोधात होणार्‍या कारवायांना चोख प्रत्युत्तर देता येईल, अशा यंत्रणेत गुंतवणूक केल्याने या क्षेत्राला तसेच सहकारी व भागीदार देशांनाही लाभ होईल. अमेरिकेबरोबरचा हा प्रकल्प म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणसिद्धतेची समीकरणे बदलणारी घटना ठरेल’, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्डस् यांनी यावेळी व्यक्त केला. जगभरात आतापर्यंत रशिया, चीन व अमेरिकेने हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित केली असून, जपान व भारताकडूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

leave a reply