चीनचे वाढते वर्चस्व ‘नाटो’ देशांच्या सुरक्षेसाठी आव्हान

-नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग

ब्रुसेल्स – चीनचे वाढते वर्चस्व नाटो सदस्य देशांच्या सुरक्षेसाठी सर्वाधिक महत्त्वाचे आव्हान ठरते आहे, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. मंगळवारी ‘नाटो २०३०’ नावाचा अहवाल प्रसिद्ध होत असून या पार्श्‍वभूमीवर नाटो प्रमुखांनी दिलेला हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. नाटोकडून प्रसिद्ध होणार्‍या नव्या अहवालातही चीनच्या धोक्याचा उल्लेख असून, त्याला रोखण्यासाठी आक्रमक भूमिका आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नाटोतील अमेरिकेच्या दूत के बेली हचिसन यांनीही चीन व्यापार, संरक्षण तसेच अंतराळक्षेत्रात वेगाने हालचाली करीत असल्याचे सांगून चीनच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे.

‘चीनकडून नव्या व प्रगत शस्त्रास्त्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. आर्क्टिकपासून ते आफ्रिकेपर्यंत हा देश हळूहळू नाटो सदस्य देशांच्या सीमांनजिक आपले अस्तित्व दाखवू लागला आहे. चीनकडून आपल्या पायाभूत सुविधा व संवेदनशील क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. हे सर्व करीत असताना चीन मानवाधिकारांचा आदर करीत नाही व नाटो सदस्य देशांच्या मूल्यांवरही विश्‍वास ठेवत नाही, याची जाणीव असायला हवी. चीनकडून सातत्याने इतर देशांना धमकाविण्याचा प्रयत्नही केला जातो. नाटोतील सहकारी देश व त्याचवेळी समविचारी देशांची एक आघाडी म्हणून आपण चीनच्या या धोक्याचा एकजुटीने मुकाबला करायला हवा’, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला.

स्टॉल्टनबर्ग यांच्याबरोबरच अमेरिकेच्या नाटोतील दूत हचिसन यांनीही चीनच्या धोक्याकडे लक्ष वेधले. युद्धनौका, पाणबुड्या व इतर प्रगत यंत्रणांच्या सहाय्याने चीन आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अमेरिकी दूतांनी बजावले. त्याचवेळी चीनच्या लष्कराकडून अंतराळक्षेत्रात मोठ्या हालचाली सुरू असल्याचा दावाही हचिसन यांनी केला. आर्थिक क्षेत्रात चीनकडून शिकारी धोरणांचा वापर करण्यात येत असून, त्या जोरावर युरोपात मोठ्या प्रमाणात बंदरे व इतर मालमत्ता ताब्यात घेतल्याचे दिसून आल्याची आठवणही अमेरिकी दूतांनी यावेळी करून दिली. सागरी क्षेत्रातही चीन इतर देशांचा मुक्त वावर रोखण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अमेरिकेच्या दूत हचिसन यांनी केला.

व्यापारयुद्ध व कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने चीनविरोधातील राजनैतिक संघर्षाची धार अधिक तीव्र केली आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर व्यापक आघाडी उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी चीनला रोखण्यासाठी ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये नाटोच्या धर्तीवर लष्करी आघाडी उभारण्याबाबत संकेतही दिले होते. नाटो सदस्य देश असलेल्या युरोपिय देशांनीही चीनविरोधात आक्रमक धोरण स्वीकारावे म्हणून अमेरिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. नाटोच्या नेतृत्त्वानेही याची दखल घेण्यास सुरुवात केली असून गेल्या दोन महिन्यात नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांच्याकडून सातत्याने चीनच्या धोक्याबाबत इशारे दिले जात आहेत.

सप्टेंबर महिन्यात, ‘सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी ऍनॅलिसिस’ या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, जगात संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणार्‍या देशांमध्ये चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे याकडे लक्ष वेधून नाटोने चीन संदर्भात ठोस दृष्टीकोन ठेवायला हवा, असे स्टॉल्टनबर्ग यांनी बजावले होते. तर ऑक्टोबर महिन्यात युरोपात झालेल्या एका बैठकीत, चीनच्या उदयाने जागतिक सत्तास्पर्धेचा समतोल बदलू लागला असून याची दखल घेणे नाटोला भाग आहे, असे नाटो प्रमुखांनी सांगितले होते.

leave a reply