तैवानची संरक्षणसिद्धता वाढविण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ‘आर्म तैवान ऍक्ट’ सादर

‘आर्म तैवान ऍक्ट’वॉशिंग्टन/तैपेई – चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर तैवानची संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी अमेरिकेने अधिक व्यापक हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या संसदेत ‘आर्म तैवान ऍक्ट’ विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकात तैवानला दरवर्षी तीन अब्ज डॉलर्स संरक्षणसहाय्य पुरविण्याची तरतूद आहे. रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य माईक गॅलाघर यांनी हे विधेयक दाखल केले आहे.

‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव शी जिनपिंग यांनी तैवानचे विलिनीकरण हे त्यांच्या राजवटीचे प्रमुख ध्येय ठेवले आहे. त्यासाठी बळाचा वापर करण्याचा इशाराही दिला आहे. बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तान, युक्रेन व इराणसारख्या मुद्यांवर दाखविलेल्या कमकुवतपणामुळे चीनची सत्ताधारी राजवट अधिकच आक्रमक झाली आहे. अशा स्थितीत तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकी संसदेने पुढाकार घेणे गरजेचे आहे’, अशा शब्दात गॅलाघर यांनी विधेयकाचे समर्थन केले.

‘आर्म तैवान ऍक्ट’तैवानला चीनच्या संभाव्य आक्रमणाचा मुकाबला करता यावा म्हणून योग्य स्रोतांची व शस्त्रांची गरज असल्याचा दावाही अमेरिकी संसद सदस्यांनी केला. ‘आर्म तैवान ऍक्ट’ अंतर्गत अमेरिकेच्या संरक्षण विभागाला ‘तैवान सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह’ सुरू करणे भाग पडणार आहे. त्याचवेळी २०२३ते २०२७ अशी पाच वर्षे तैवानला तीन अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य दरवर्षी द्यावे लागणार आहे. तैवानच्या ‘असिमेट्रिक डिफेन्स’ला आवश्यक सहाय्य पुरविण्याची तरतूदही ‘आर्म तैवान ऍक्ट’मध्ये आहे.

या ऍक्टच्या पार्श्‍वभूमीवर तैवानला ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचा पुरवठा नियोजित वेळेपूर्वी व्हावा यासाठी अमेरिकेत हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या करारानुसार, २०२६ सालापर्यंत अमेरिकेची नवी ‘ब्लॉक ७० एफ-१६’ विमाने तैवानच्या ‘आर्म तैवान ऍक्ट’हवाईदलात सामील होणार आहेत. मात्र चीनचा वाढता धोका लक्षात घेता तैवानला तातडीने पुरवठा करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी ‘एफ-१६’ची निर्मिती करणार्‍या लॉकहिड मार्टिन या कंपनीला निर्देश देण्यात येतील, असे संकेत पेंटॅगॉनच्या सूत्रांनी दिले आहेत.

दरम्यान, तैवानच्या संसदेने ८.६ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त डिफेन्स बजेटला नुकतीच मंजुरी दिली आहे. २०२२ सालासाठी तैवानने १७ अब्ज डॉलर्सच्या संरक्षणखर्चाला मान्यता दिली होती. त्यात आठ अब्ज डॉलर्सहून अधिक भर टाकण्यात आली आहे. क्रूझ मिसाईल्स, अटॅक ड्रोन सिस्टिम्स व नव्या युद्धनौकांसाठी अतिरिक्त खर्चाची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

leave a reply