अझरबैजानकडून अर्मेनियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी

बाकु – गेल्या काही दिवसांपासून अझरबैजान आणि अर्मेनिया या दोन्ही देशांमध्ये पेटलेल्या संघर्षात १६ सैनिकांचा बळी गेला आहे. सोव्हियत रशियातून बाहेर पडलेल्या या दोन्ही आशियाई देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे रोखली असून अझरबैजानने अर्मेनियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला चढवण्याची धमकी दिली आहे. असे झाले तर, चेर्नोबिलच्या दुर्घटनेपेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, रशिया आणि युरोपीय महासंघाने या दोन्ही देशांना संयमाने घेण्याचे आवाहन केले आहे.

अझरबैजानकडून अर्मेनियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकीसोव्हिएत रशियातून बाहेर पडल्यापासून अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यातील सीमावाद कायम राहिला आहे. गेल्या चार वर्षांपासून या दोन्ही शेजारी देशांच्या सीमेवरील तणाव वाढत चालला असून गेल्या आठवडाभरात या तणावाचे रूपांतर संघर्षात झाले. या संघर्षात किमान सोळा सैनिकांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. यानंतर अझरबैजान आणि अर्मेनियाने आपल्या सीमेजवळ क्षेपणास्त्रे, रणगाडे, तोफा आणि ड्रोन्स तैनात केल्या आहेत. गेल्या तीन दशकात या दोन्ही मध्य आशियाई देशांच्या सीमेवर गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. मात्र पहिल्यांदाच या दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य तैनाती वाढविली असून एकमेकांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.

‘अर्मेनियाचे मेटसॅमोर अणुऊर्जा प्रकल्प आपल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने उध्वस्त होईल, हे अर्मेनियाने ध्यानात ठेवावे. आपल्या एका हल्ल्याने अर्मेनियावर आजवरचे सर्वात भीषण संकट ओढावेल’, अशी धमकी अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. यासाठी अझरबैजान क्षेपणास्त्रांबरोबर ड्रोन्सचा वापर करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गेल्या आठवड्यात अर्मेनियाने अझरबैजानचे मेंगाचेवीर धरण नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर अर्मेनियन लष्कराने अझरबैजानचे लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर, अझरबैजानने अर्मेनियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावरच हल्ला चढवण्याची धमकी दिल्याचे बोलले जाते.

अझरबैजानकडून अर्मेनियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकीअर्मेनियाची राजधानी येरेवानपासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर मेटसॅमोर अणुऊर्जा प्रकल्प आहे. अर्मेनियाच्या एक तृतीयांश भागाला या प्रकल्पातून वीज पुरवठा केला जातो. येरेवान ते मेटसॅमोर अणुऊर्जा प्रकल्पाच्या भागात १० लाखाहून अधिक जणांची लोकवस्ती आहे. त्यामुळे अझरबैजानने या प्रकल्पावर हल्ला चढवला, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. अझरबैजानच्या या धमकीमुळे मध्य आशियात नव्या चेर्नोबिलची शक्यता वाढल्याचा इशारा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला आहे. युक्रेनमधील चेर्नोबिल आणि अर्मेनियाच्या मेटसॅमोर या दोन्ही प्रकल्पांची निर्मिती एकाच काळात झाली होती. १९८६ साली भूकंपामुळे चेर्नोबिल प्रकल्पात भीषण आण्विक गळती व जीवितहानी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर अझरबैजानने अर्मेनियाला दिलेल्या या धमकीचे गांभीर्य वाढले आहे.

अझरबैजानने दिलेल्या या धमकीवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भारताने दोन्ही मध्य आशियाई देशांना संयमाने घेण्याचे आवाहन केले आहे. रशियाने आपल्या दोन्ही शेजारी देशांना संघर्षबंदीचे आवाहन केले असून मध्यस्थी करण्याची तयारीही व्यक्त केली आहे. दरम्यान, तुर्कीने अझरबैजानला शस्त्रसज्ज करून युद्ध भडकल्यास अर्मेनिया विरोधात सहाय्य करण्याचे जाहीर केले आहे.

leave a reply