अमेरिकी कंपन्यांची भारतात ४० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – भारतात यावर्षात आतापर्यंत अमेरिकन कंपन्यांनी ४० अब्ज डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) केली आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही अमेरिकी कंपन्यांनी भारतात केलेली ही प्रचंड गुंतवणूक लक्षवेधी ठरते. यातून अमेरिकन कंपन्यांचा भारतीय बाजारावर विश्वास वाढत असल्याचे अधोरेखित होते. त्याचवेळी भारतात अमेरिकी कंपन्यांनी केलेल्या गुंवणूकीचा दाखल देऊन भारत चीनचा मोठा प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आल्याचा दावा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी केला आहे.

‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशीप फॊरम’ (यूएसआयएसपीएफ) या व्यापार सल्लागार गटाने केलेल्या दाव्यानुसार अमेरिकी कंपन्या भारतीय बाजार आणि येथील नेतृत्वावर विश्वास दखवत आहेत. त्यामुळे जगातिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करणाऱ्या कोरोनाच्या संकटाच्या काळातही अमेरिकेतून मोठी गुंतवणूक भारतात आली आहे. या वर्षात आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक अमेरिकी कंपन्यांनी केल्याचा दावा ‘यूएसआयएसपीएफ
‘ने केला आहे.

अमेरिकी कंपन्यांची भारतात ४० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

गेल्या काही आठवड्यातच २० अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंवणूक अमेरिकी कंपन्यांनी भारतात केली आहे, याकडे ‘यूएसआयएसपीएफ’चे अध्यक्ष मुकेश आघी यांनी लक्ष वेधले. गुगल, फेसबुक, वॉलमार्ट सारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. भारत सध्या अमेरिकी कंपन्यांचेच नव्हे इतर देशांसाठीही आकर्षक गुंतवणूक केंद्र ठरले आहे. आखाती देशातूनही भारतात गुंतवणूक वाढली आहे, असे आघी यांनी म्हटले आहे.

यातून गुंतवणूकदारांसाठी भारत अजूनही आकर्षक बाजारपेठ आहे, हे स्पष्ट होते, असा दावाही आघी यांनी केला. भारत सरकारकडून गुंतवणूक नियम सुलभ केले जात आहेत. देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे. या धोरणांचा परिणाम दिसून येत असल्याचे ते म्हणाले. चीनमधून अमेरिकी कंपन्यांनी बाहेर पडावे, असे ट्रॅम्प प्रशासनाने बजावले असताना भारतात होणाऱ्या या गुंतवणुकीचे महत्व वाढले आहे.

गुरुवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनीही अमेरिकन कंपन्यांसाठी भारत गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र ठरत असल्याचा दावा केला. भारतात गुगल, फेसबुक, अमॅझॉनसारख्या कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा दाखला देत अमेरिकी कंपन्यांचा विश्वास चीनने गमावल्याचे आणि त्यावेळी भारत चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून समोर आल्याचे कुडलो म्हणाले. भारताने कॉर्पोरेट टॅक्समध्ये घट केल्याने भारत गुंवणूकदारांसाठी आकर्षक केंद्र बनेल, असे कुडलो यांनी म्हटले आहे.

दरम्यान,१० जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताची परकीय गंगाजळी ५१६ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. एका आठवड्यात देशाच्या परकीय गंगाजळीत ३.१ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. ३ जुलैला संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय गंगाजळी ५१३.५४ अब्ज डॉलर्स होती. यामध्ये ‘फॉरेन करन्सी ऍसेट’च्या (एफसीए) रूपात २.३७२ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. तसेच सुवर्णसाठ्याचे मूल्य ७१ कोटी २० लाख डॉलर्सने वाढले आहे. रिझर्व्ह बँकेकडील सुवर्ण साठ्याचे मूल्य ३४.७२९ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.

leave a reply