चिनी अ‍ॅप्सवरील बंदीचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल

- चीनच्या राजनैतिक अधिकार्‍याचा दावा

द्विपक्षीय संबंधनवी दिल्ली – ५८ चिनी अ‍ॅप्सवर भारताने टाकलेली बंदी यापुढेही कायम राहणार आहे. याचा द्विपक्षीय संबंधांवर विपरित परिणाम होईल, अशी चिंता चीनकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी भारताचा हा निर्णय जागतिक व्यापार परिषदेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचा ठपकाही चीनने ठेवला आहे. त्याचवेळी गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या आपल्या सैनिकांना शौर्य पुरस्कार देऊन भारत चीनविरोधी भूमिका स्वीकारत असल्याचा दावाही चीनच्या काही विश्‍लेषकांनी केला आहे.

लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. यानंतर भारतात चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळली. भारताने चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी अ‍ॅप्सवर बंदी घोषित केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिनी अ‍ॅप्स घातक ठरतात, असे सांगून भारत सरकारने सुमारे ५८ चिनी अ‍ॅप्स बंद केले होते. यामध्ये टिकटॉक सारख्या भारतात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या अ‍ॅपचा देखील समावेश होता. सुरूवातीचा काही काळ भारताची ही बंदी कुचकामाची ठरेल, असे दावे चीनने ठोकले होते. पण कालांतराने चीनला याची झळ बसू लागली.

आता टिकटॉकची मालकी असलेल्या चिनी कंपनी बायटेंडन्सने बंदी कायम राहिल्याने भारतातील आपला कारभार बंद करण्याची घोषणा केली आहे. यावर चीनकडून प्रतिक्रिया आली असून भारतील चीनच्या दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करून भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा घेतलेला हा निर्णय जागतिक व्यापार परिषदेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे रोंग म्हणाले. तसेच याचा भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर विपरित परिणाम होईल, असा इशाराही रोंग यांनी दिला आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गलवान व्हॅलीतील चिनी जवानांच्या भ्याड हल्ल्याचा समर्थपणे मुकाबला करणार्‍या कर्नल संतोष बाबू यांना मिळालेल्या शौर्य पुरस्कारानेही चीन अस्वस्थ झाला आहे. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना चीन भारताला सकारात्मक संदेश देऊन आपल्या सदिच्छा व्यक्त करीत आहे. पण भारत त्याकडे दुर्लक्ष करून चीनला अधिकाधिक चिथावणी देत चालला आहे.

याद्वारे आपल्याला या सीमेवरील तणाव कमी करण्यात स्वारस्य नसल्याचे भारत सार्‍या जगाला व चीनच्या जनतेला दाखवून देत असल्याची टीका चिनी विश्‍लेषक करीत आहेत.

भारतीय माध्यमे देखील उभय देशांमधील तणाव वाढवित असल्याचा ठपका चीनच्या विश्‍लेषकांनी ठेवला आहे. सिक्कीमजवळच्या नकुला येतील एलएसीवर दोन्ही देशांच्या सैनिकांची झटापट झाली व यात चीनचे २० जवान जखमी झाल्याची बातमी माध्यमांमध्ये आली होती. या बातम्या खोट्या आहेत, असा दावा चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वर्तमानपत्राने केला. वेगळ्या शब्दात एलएसीवरील तणाव व चकमक यांची माहिती भारतीय माध्यमांनी आपल्या जनतेला देऊ नये, असे चीनचे म्हणणे आहे. एलएसीवर घुसखोरी करीत राहून भारताच्या बाजारपेठेचाही लाभ घेण्याचे चीनचे मतलबी धोरण भारतीय माध्यमांनी उघड केल्याने, चीन सतत माध्यमांना लक्ष्य करीत असल्याचे दिसत आहे.

leave a reply