अमेरिकन नौदलाच्या गस्तीनंतर साऊथ चायना सीमध्ये चीनच्या नौदलाचा युद्धसराव

चीनचे नौदलबीजिंग – अमेरिकन नौदलाच्या ‘युएसएस रुझवेल्ट’ या विमानवाहू युद्धनौकेच्या ताफ्याने साऊथ चायना सी क्षेत्रामध्ये गस्त घातली होती. यानंतर चीनचे नौदल या क्षेत्रात आपल्या युद्धनौकांसह सराव करीत आहे. २७ ते ३० जानेवारी दरम्यान या क्षेत्रात कुठल्याही परदेशी जहाजाला सुरक्षेच्या कारणास्तव बंदी असेल, असे चीनने जाहीर केले आहे. याआधीही साऊथ चायना सीच्या क्षेत्रात अमेरिकन युद्धनौकांनी गस्त घातल्यानंतर, चीनच्यो नौदलाने आपले अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी या क्षेत्रात गस्त तसेच सरावाचे आयोजन केल्याचे उघड झाले होते.

२३ जानेवारी रोजी ‘युएसएस रुझवेल्ट’ या विमानवाहू युद्धनौकेने विनाशिकांच्या ताफ्यासह साऊथ चायना सीच्या क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या नौदलाच्या ‘सेव्हन्थ फिल्ट’ची या क्षेत्रातील ही गस्त नियोजित असल्याची माहिती अमेरिकेने दिली. तसेच या क्षेत्रातील वाहतुकीचे स्वातंत्र्य व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आपल्या नौदलाची ही गस्त असल्याचे दावे अमेरिकेने केले होते. मात्र अमेरिकेच्या या गस्तीवर चीनने टीका केली होती. आपल्या सामर्थ्याच्या प्रदर्शनासाठी अमेरिका साऊथ चायना सी क्षेत्रात गस्त घालत आहे. या क्षेत्राचे स्थैर्य व सुरक्षेच्या दृष्टीने ही गस्त घातक ठरेल, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी केला होता.

चीनचे नौदल

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी चुकीची धोरणे राबवून चीनला आपले वैरी ठरविले होते. त्याचा अमेरिका-चीन संबंधांवर विपरित परिणाम झाला, असे झाओ लिजियान पुढे म्हणाले. मात्र अमेरिका साऊथ चायना सीच्या क्षेत्रात गस्त घालून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करीत असल्याचे आरोप करणार्‍या चीनने, या क्षेत्रात आपल्या नौदलाच्या कारवाया सुरू करून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी झाल्याचे दाखवून दिले आहे. चीनच्या नौदलाने आपल्या अ‍ॅम्फिबिअस युद्धनौकांसह सुरू केलेला युद्धसराव हेच सिद्ध करीत आहे. त्याचवेळी २३ जानेवारी रोजी अमेरिकन नौदलाचा ताफा आपण पिटाळून लावल्याच्या फुशारक्या देखील चीनच्या नौदलाने मारल्या होत्या. मात्र या दाव्यात काडीचेही तथ्य नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले होते.

अमेरिका व चीनचे नौदल साऊथ चायना सीच्या क्षेत्रात नेहमीच एकमेकांसमोर येते व त्यांच्यात संघर्ष भडकू शकतो, असा इशारा याआधी दोन्ही देशांनी दिला होता. मात्र या क्षेत्रातील सुरक्षा व वाहतुकीचे स्वातंत्र यासाठी आपली गस्त आवश्यक असल्याचे सांगून अमेरिकेने पुढच्या काळातही ही गस्त सुरू राहणार असल्याचे बजावले होते. तर साऊथ चायना सीचे संपूर्ण क्षेत्र आपल्याच मालकीचे असल्याचे अतिरेकी दावे करणारा चीन, अमेरिकेची ही गस्त आपल्याला आव्हान देत असल्याचे आरोप करीत आहे.

ट्रम्प यांच्यानंतर बायडेन यांचे प्रशासन अमेरिकेत सत्तेवर आल्यानंतरही अमेरिकन नौदलाने साऊथ चायना सीच्या क्षेत्रात गस्त घालून चीनला इशारा दिल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. तर या क्षेत्रात आपल्या नौदलाच्या सरावाचे आयोजन करून चीन देखील बायडेन यांच्या प्रशासनाला तितकेच आक्रमक संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यामुळे उघड झाले आहे.

leave a reply